Header Ads Widget

sakhari nate : साखरी नाटे जिल्हा परिषद गणांत महिलाराज? कुणबी मते ठरणार निर्णायक ?

संदीप शेमणकर 

राजापूर -  राजापूर तालुक्यातील नव्याने निर्माण झालेल्या साखरी नाटे जिल्हा परिषद गणांत अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते. मात्र सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्याने अनेकांना आपली तलवार म्यान करावी लागली, तर काहींनी आपल्याच घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.  काहींनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. 

मुळात साखरी नाटे जिल्हा परिषद गण  शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र शिवसेना फुटली आणि दोन गट झाले. शिंदे यांची शिवसेना, तर दुसरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना. त्यातच भाजपसुद्धा आपलं नशीब आजमावण्यासा प्रयत्नशील आहे. मात्र तुल्यबळ  लढत शिंदेसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना यांच्यात होणार आहे. यात दोन्ही पक्षांचे उमेदवार तगडे असणार आहेत. शिवसेनेचे राजापूर, लांजा,साखरपा विधानसभेचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी विकासकामांचा सपाटा लावला आहे. त्याचप्रमाणे माजी आमदार राजन साळवी आणि जनसेवक निलेश सांबरे हेसुद्धा शिंदेंच्या शिवसेनेते सामील झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे नेते नसले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. अशाच कार्यकर्त्याच्या जीवावर ठाकरेंची शिवसेना अजून आपले पाय घट्ट रोवून उभी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तीन दिगज्ज नेत्यांमध्ये कोणाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार आणि कोण कोणाला साथ किती देणार? हे पाहवे लागणार आहे. 

एकीकडे निष्ठावंत कार्यकर्त्याची फौज आणि दुसरीकडे दिगज्ज नेत्यांची फौज यांचा मतदार राजावर किती फरक पडणार आहे आणि मतदारराजा नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहणार आहे, येणारा काळच ठरवेल, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगलीय. जे गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहिले होते त्यांचे नाराजीचे सूर 'वाजू' लागले आहेत. त्यातच साखरी नाटे जिल्हा परिषद गणात कुणबी मतदार निर्णायक ठरणार आहेत. ते ज्या बाजूने उभे राहतील त्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो,  पण निवडून आल्यावर कुणबी समाजाचे प्रश्न सुटणार की, आता जसे आहेत तसेच प्रलंबित राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच मुस्लीम मतेही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. 


Post a Comment

0 Comments