thane rape in temple : देवा, बंद होती का दिव्यदृष्टी तुझी?
हो, देवा...हा प्रश्न तुझ्यासाठीच आहे. ठाण्यातील शीळ फाटा गणेश घोळ मंदिर...तुझंच वास्तव ना...मग तीन नराधम पुजारी तुझ्याच मंदिरात एका विवाहितेवर अत्याचार करतात...तोही आळीपाळीने...अरे, या वेदनादाय, धक्कादायक घटनेने मंदिराच्या भिंतींनाही वेदना झाल्या असतील ना रे....खांबही शहारले असतील...मंदिरातील पणत्यांनाही पाझर फुटला असेल... मग तुला का नाही दिसला अत्याचार...घरातील भांडणाला वैतागून तुझ्या आसऱ्याला आलेली ती महिला तुला दिसली नाही का? सकाळी उठल्यावर तिच्या आरोळ्या, तिचा टाहो तुला ऐकायला आला नाही का? तुझ्या मंदिरात तर भक्तिभाव असतो, मग या उत्तर प्रदेशातून आलेल्या तीन पुजाऱ्यांचं हृदय पाषाणाचं होतं हे तू का नाही ओळखलंस. तुला माणसातला भाव कळतो, अणूरेणू कळतो, मग या पुजाऱ्यांच्या मनातली वासना का नाही कळली तुला? अरे, पुजारी नव्हे तर या पुजाऱ्यांचा रुपातले वासनांध नराधम तुझी पूजा करणार आहेत आणि एका महिलेची शिकार करणार आहेत याची कल्पना का आली नाही तुला? तुला का झाला नाही दृष्टांत...? श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे विवाहितेचे लचके तोडत असताना तुला पाझर का नाही फुटला?
देवा, तू अनेक रुपांमध्ये असतोस. वापरतोस. मग एका महिलेवर अत्याचार सुरू असताना तू का नाही रूप धारण केलंस? एखादा माणूस होऊ शकला असतास...सापाचं रूप धारण करून नराधमांना दंश करू शकला असतास...पण तू ते नाही केलंस? का ? ती कुणाची पत्नी होती, कुणाची बहीण होती...कुणाची आई होती...कुणाची मुलगी होती...कदाचित ती तुझी भक्त नसेलही, पण तुझ्या आसऱ्याला आलेल्या तिला तू वाचवू शकला नाहीस.
देवा, दिवसभर ती तुझ्या मंदिरात होती. या नराधम पुजाऱ्यांनी तिला जेवू घातलं...आणि चहातून गुंगीचं औषध दिलं. अरे, तू तुझ्या शक्तीने गुंगीची मात्रा तरी कमी करू शकला असतास ना...का केली नाहीस गुंगीची मात्र कमी...तू असा अचल राहिल्यानेच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देव काय करील, असे म्हणतील काही जण...पाषाण हृदयाप्रमाणे....पण रात्रभर ज्या वेदना, ज्या यातना सहन ती सहन करत राहिली ते तुझ्या दिव्यदृष्टीला दिसलं नाही का?
बरं, तिला जाग आल्यानंतर झाला प्रकार लक्षात आला. ती ओरडायला लागली. तेव्हा तरी तिच्या मदतीला तू धावायला हवा होतास. तू नाहीच धावलास, धावले ते नराधम पुजारी...मदतीला नव्हे तर तिचा गळा दाबायला...त्यांनी तो क्रूरपणे दाबलाही...बिंग फुटू नये म्हणून बळीच घेतला तिचा...त्यावेळीही तुला तुझी करामत दाखवता आली नाही का? त्या नराधम पुजाऱ्यांची वासना तर थांबवू शकला नाहीस, पण तिचा जीवही वाचवू शकला नाहीस. असा कसा रे तू शांत, स्तब्ध राहिलास...जणू काही घडलंच नाही. आणि ते नराधमही कसले...त्यांना तर तुझी जराही भीती वाटली नाही...ज्याची पूजा करतोय त्याच्याच मंदिरात शेण खात आहोत, याची जाणीवही नाही झाली त्या क्रूरकर्म्यांना...तिला लादीवर आपटलं...आधी तिला लुटलं आणि नंतर आपटलं...आणि फेकून दिला तिचा मृतदेह...जणू काही घडलंच नाही...तिनं चूक केली का तुझ्या मंदिरात थांबून...एक रात्री आसरा घेतला...लाडकी बहीण योजना आखल्या जाताहेत, पण देवा मग ती तुझी लाडकी बहीण नव्हती का...सर्व संपलं...आता दोष कुणाला देणार...पोलिसांनी नराधमांना अटक केली...काही दिवसांनी ते उजळ माथ्याने फिरतील...तरीही तू त्यांना माफ करणार का?
देवा, अजून खूप प्रश्न आहेत. पण तुला पुजण्यासाठी माझ्या मातीतले पुजारी नाही का सापडले? हा अवघा महाराष्ट्र मंदिरांचा आहे...अनेक पुजारी आहेत... मग तुझ्या पूजेसाठी उत्तर प्रदेशातलेच पुजारी का?...या प्रश्नांची उत्तर असतीलही तुझ्याकडे...पण तू बोलणार नाहीस...पण एक शाश्वत प्रश्न निर्माण झालाय... तू असा किती दिवस दृष्टिहीन होऊन बसणार आहेस?
0 Comments