rajapur bridge : अर्जुना नदीवरील मोठ्या पुलाला 'भाई हातणकर' यांचे नाव देण्याचा ठराव
प्रतिनिधी
राजापूर - मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे अर्जुना नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला माजी मंत्री कै. ल. र. तथा भाई हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाला, अशी माहिती समितीचे सदस्य दीपक नागले यांनी दिली.
अर्जुना नदीवर बांधण्यात आलेला हा मुंबई - गोवा महामार्गावरील सर्वाधिक उंचीचा पूल आहे. त्यामुळे या पुलाला राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व असलेले आणि राजापूरचे पहिले राज्यमंत्री कै. ल. रं. तथा भाई हातणकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा राजापूरच्या वतीने रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्याचबरोबर अर्जुना नदीवरील पुलाला भाई हातणकर यांचे नाव देण्याची मागणीही जिल्हा नियोजन समितीच्या सभेत करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई - गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील पुलाला राज्यमंत्री कै. ल. रं. तथा भाई हातणकर यांचे नाव देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये झाला. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा राजापूरचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले यांनी दिली.
कै. भाई हातणकर यांच्याबाबत
कै. हातणकर यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद भूषविले. राजापूर विधानसभा मतदारसंघातून मंत्रिपद भूषवणारे ते पहिले आमदार होते. भाई हातणरक यांनी मंत्रिमंडळामध्ये आठ खात्यांचा कारभार पाहिला होता. महसूल खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, सहकार खाते, मत्स व्यवसाय खाते, बंदर विकास खाते, पूनर्वसन खाते या खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला होता. कै. भाई हातणकर यांनी विविध राजकीय पक्षांकडून राजापूर मतदारसंघाचे पाच वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले. राजापूर तालुक्याला कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रस्त्यांच्या साहाय्याने जोडण्यात भाई हातणकर यांचे योगदान मोठे आहे.
0 Comments