Header Ads Widget

छत्रपती शिवराय कोणत्याही देवापेक्षा महान होते..!

छत्रपती शिवराय दैवतीकरण वाद – शिवजयंती विशेष लेख

सौजन्य आणि आभारी - बाळासाहेब गरुड (BG), फेसबुक पेज

आज शिवजयंती..!

मित्रांनो, शिवरायांसारख्या महान राजाला जयंतीनिमित्त अभिवादन करत असतानाच त्यांचे पुन्हा एकदा ब्राह्मणीकरण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याबाबतही आपण जागरूक असायला हवे. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे सध्या मराठा - बहुजनांच्या लग्नात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणण्याची सुरू झालेली प्रथा. शिवरायांच्या दैवतीकरणाची ही सुरुवात म्हणावी लागेल. महामानवांचे दैवतीकरण म्हणजे ब्राम्हणी व्यवस्थेचे बळकटीकरण हे लक्षात घ्यायला हवे. 

छत्रपती शिवरायांना बहुजन इतिहास संशोधक व विचारवंत यांनी महत्प्रयासाने ब्राह्मणवादी कचाट्यातून सोडवून त्यांचे समतावादी सत्य स्वरूप समाजासमोर स्पष्ट केले आहे. आरतीच्या माध्यमातून शिवरायांचे दैवतीकरण करून आपण त्या सर्व बहुजन इतिहास संशोधक आणि विचारवंत यांचे कार्य मातीमोल तर ठरवत नाही ना याचा विचार प्रत्येक शिवभक्ताने करणे आवश्यक आहे.

मित्रांनो, एखाद्या महामानवाचे जेव्हा आपण दैवतीकरण करतो, तेव्हा त्याने केलेलं कार्य हे दैवी कार्य ठरतं आणि  असे काम फक्त तीच व्यक्ती करू शकते, कारण ती दैवी होती; आपण असे काम करूच शकत नाही, कारण आपण तर सामान्य मानव आहोत', असा नकारार्थी विचार मानवी मनात मूळ धरू लागतो. परिणामतः समाजात हतबलता पसरते आणि ’आपल्या उद्धारासाठी कोणीतरी अवतारी पुरुष पुन्हा जन्म घेईल’ असा परावलंबी ब्राम्हणी विचार समाजमनात पसरतो.

मित्रांनो, छत्रपती शिवराय हे कोणी दैवी पुरुष नव्हते, तर अस्सल मनुष्य होते हे अगोदर लक्षात घ्या. मांसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांचे संस्कार, तत्कालीन परिस्थितीचे योग्य आकलन, आपले इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तथा आपल्या भूगोलाचा योग्य वापर यामुळे ते महानतेच्या अत्युच्च शिखरावर पोहोचले. शिवरायांचे गुण जीवनात अंगीकारले, तर सामान्य माणूसही त्यांच्यासारखे महान काम करू शकतो हा संदेश  शिवरायांच्या चरित्रातून मिळतो, पण त्यांचे दैवतीकरण करून आपण त्यांना देव्हाऱ्यात बसवले, तर मात्र अजाणतेपणे आपण या संदेशाला हरताळ फासल्यासारखे होईल.

प्रबोधनकार ठाकरे एके ठिकाणी म्हणतात, "शिवाजी या त्रिअक्षरी मंत्रापुढे तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते." अर्थात शिवरायांचे कार्य इतके महान आहे की त्यापुढे ब्राह्मणी पुराणांतील काल्पनिक देवादिकांचे काल्पनिक कार्य शून्यवत आहे असे प्रबोधनकारांना सुचवायचे आहे. ब्राह्मणी देवादिकांचे कार्य आणि पराक्रम काय आहे हे पुराणांतील त्याविषयीच्या कथा वाचल्या तर आपल्या लक्षात येईलच. देवांचा राजा इंद्राचे प्रताप आठवा. कुठे छत्रपती शिवरायांसारखा शीलवान, चारित्र्यसंपन्न तथा शूरवीर राजा आणि कुठे इंद्रासारखा स्रीलंपट, चारित्र्यहीन तथा भेदरट कॅरेक्टर.. जे प्रत्येक संकटाच्या वेळी इतरांकडे मदतीसाठी धाव घेते..! आपण शिवरायांना अशा देवतांच्या रांगेत बसवणार आहोत काय?

ब्राह्मणी व्याख्याते, प्रवचनकार, कादंबरीकार, कथाकार हे शिवरायांचा असत्य इतिहास सांगतांना ’शिवरायांमुळे देव्हाऱ्यात देव असल्या’चे सांगतात. भूषण नावाचा शिवकालीन कवी आपल्या ’शिवभूषण’ या काव्यग्रंथात लिहितो की, 

”काशी की कला गई, 

मथुरा मस्जिद भई, 

अगर शिवाजी न होते, 

तो सुन्नत होती सबकी” 

काही वेळासाठी हे ब्राह्मणी विचार सत्य मानले, तर त्यांच्या मांडणीप्रमाणे त्यांच्या देवादिकांना स्वतःच्या रक्षणासाठी शिवरायांचा धावा करावा लागतो. याचा अर्थ शिवराय या ब्राह्मणी देवादिकांपेक्षा खूप मोठे आहेत. आरती करून आपण काल्पनिक देवादिकांपेक्षा महान असणाऱ्या शिवरायांना लहान तर करत नाही ना हा विचार केला पाहिजे.  

आज शिवरायांची आरती म्हटल्या जात आहे. उद्या मंदिरं बांधली जातील आणि जिथे मंदिर तिथे भट पुजारी हा तर नियमच आहे. माझा प्रश्न हा आहे, की ज्या जमातीने आयुष्यभर शिवरायांना त्रास दिला आणि त्यांच्या देहावसानानंतरही त्यांना विस्मृतीत ढकलण्याचा, बदनाम करण्याचा, त्यांचा खोटा इतिहास आपल्या माथी मरण्याचा प्रयत्न केला, मंदिर बांधून अशा जमातीच्या पोटापाण्याची सोय आपण लावणार आहोत का? मंदिरं ही काल्पनिक देवतांची बांधल्या जातात, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची नव्हे. छत्रपती शिवराय हे ऐतिहासिक पुरुष होते. त्यासंदर्भात हजारो पुरावे उपलब्ध आहेत, मग काल्पनिक ब्राह्मणी देवतांप्रमाणे त्यांची आरती कशी म्हटल्या जाऊ शकते आणि मंदिर कसे बांधल्या जाऊ शकते?

तात्पर्य, आरती करून शिवरायांना देव बनवण्यापेक्षा त्यांचा मानवतावाद, मातृपितृभक्ती, रयतेवरील अपार माया, विजिगीषु वृत्ती, भयंकर संकटांनाही न डगमगता सामोरे जाण्याची क्षमता, असामान्य धैर्य आणि आपल्या महानतम जीवनातून त्यांनी स्थापित केलेला विचार शतांशानेही आपण आपल्या जीवनात आचरणात आणू शकल्यास तेच शिवरायांना खरे अभिवादन ठरेल.

जय शिवराय..!

✍🏼 बाळासाहेब गरुड (BG)

#ShivajiMaharaj #ShivJayanti #Shivray #Swarajya #Maharashtra #Editorial #HistoryDebate #JayShivray छत्रपती शिवाजी महाराज, शिवजयंती, शिवराय दैवतीकरण वाद, शिवचरित्र, मानवतावाद, स्वराज्य विचार, महाराष्ट्र इतिहास, संपादकीय लेख, सामाजिक विश्लेषण, शिवराय प्रेरणा



Post a Comment

0 Comments