संदीप शेमणकर
विरार - 'मुलगा सानेगुरुजींसारखा घडवायचा असेल तर आताच्या सर्व आईंनी 'श्यामची आई' बना,' असा अनमोल सल्ला माननीय सदानंद पुंडपाळ सर यांनी दिला. इतकेच नव्हे तर श्यामची आई हे पुस्तक जरूर वाचा, असाही सल्ला त्यांनी दिला. मूल हे संवेदनशील असतं, त्याच्याकडे बुद्धिमत्ता असते, ही बुद्धिमत्ता आई - वडिलांना ओळखता आली पाहिजे. मुलाचे गुण ओळखता आले की, आपला मुलगा किंवा मुलगी कोण होणार आहे, त्याला काय घडवू शकतो, हे पालकांना समजू शकते, असेही पुंडपाळ सर यांनी सांगितले. माझे विद्यार्थी हीच माझी मोठी संपत्ती आहे, असेही पुंडपाळ सर यांनी सांगितले.
श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे या हायस्कूलच्या आजी - माजी विद्यार्थ्यांतर्फे माननीय पुंडपाळ सर यांचा करिअर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम 15 जून 2025 रोजी विरार येथील शास्त्री विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यासाठी सर्व आजी - माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता.
या कार्यक्रमात पुंडपाळ सर यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करतानाच तुम्ही नवीन आव्हानांना कसे सामोरे जाल आणि भविष्यात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याची परिपूर्ण माहिती दिली. कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसोबतच विविध पदविका अभ्यासक्रमांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. अभ्यासाबरोबरच प्रेझेंटेशन, व्यक्तिमत्व विकास यांसारख्या गोष्टीही जीवनात महत्त्वाच्या असतात आणि त्यासाठी किती मेहनत, कष्ट घ्यावे लागतात याविषयी त्यांनी उपस्थिती विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला.
पुंडपाळ सर 1976 मध्ये आडिवरे हायस्कूलध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. कोकणात येऊन शिक्षक व्हावे असे पुंडपाळ सर यांचे स्वप्न होते. साने गुरुजी आणि वि. स. खांडेकर यांचे साहित्य वाचून आपण कोकणात जावे असे वाटत होते. मा. चव्हाण सर यांच्यामुळे आडिवरे हायस्कूलमध्ये शिक्षक झालो आणि आज तुम्हाला सर्वांना पाहून सर्व सार्थक झाले आहे असे वाटते, असेही पुंडपाळ सर यांनी सांगितले.
श्री महाकाली इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी गेली 32 वर्षं पर्यवेक्षक म्हणून सेवा केली. आडिवरे हायस्कूल, विद्यार्थी आणि आडिवरे परिसरातील भरभरून प्रेम देणाऱ्या लोकांविषयी पुंडपाळ सरांनी आठवणी जागवल्या. उत्तूर ही जन्मभूमी असली तरी आडिवरे ही कर्मभूमी आहे, असेही त्यांनी सांगितले. माझा विद्यार्थी मागे राहता कामा नये, त्याने खूप शिकावे आणि मोठे व्हावे या भावनेतूनच विद्यार्थ्यांना ओरडत असे, मारत असे, अशाही भावना पुंडपाळ सरांनी व्यक्त केल्या.
आडिवरे सोडतानाची पुंडपाळ सरांनी सांगितलेली आठवण डोळ्यात पाणी आणणारी होती. 'सेवानिवृत्तीनंतर आडिवरे सोडण्याचे ठरले. ही गोष्ट अनेकांनी माहिती पडली. जो भेटे तो म्हणे, सर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, आमच्या मुलांचे कसे होणार, आम्ही तुम्हाला जागा देतो, तुम्ही आडिवऱ्यातच घर बांधा आणि राहा. पण जाऊ नका. जड्यार गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी खास असे ऋणानुबंध निर्माण झाले होते. आम्ही आडिवरे सोडणार हे कळल्यानंतर त्यांच्या घरचे वातावरण बदलले. त्यांच्या घरी धड जेवणही बनवले जात नव्हते. शेवटी टेम्पो निघाला. जड्यार गुरुजींनी मिठी मारली आणि दोघांच्या डोळ्यांतून पाणी आलं. टेम्पोतून जातानाही खाली मान घातली. कुणी भेटला आणि विचारले, सर कुठे जाता ? तर त्यांना काय सांगू, असे मनात यायचे आणि डोळ्यांसमोर आडिवऱ्याचा इतिहास, येथील भरभरून प्रेम देणारी माणसं, माझी शाळा, माझे विद्यार्थी आठवयाचे. आडिवऱ्याने मला खूप काही दिलं. त्या ऋणानुबंधात राहायला आवडेल.' अशा आठवणी पुंडपाळ सरांनी जागवल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाज आडिवरे - कशेळी - गावखडीचे अध्यक्ष प्रभाकर वारीक होते. तसेच यावेळी व्यासपीठावर येऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुंडपाळ सरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या विद्यार्थ्यांची मुलेही उपस्थित राहिल्याने मन भरून आले, अशा भावनाही पुंडपाळ सरांनी व्यक्त केल्या. करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज वारीक यांनी अतिशय उत्तमपणे केले.
माननीय पुंडपाळ सर यांनी विविध साहित्य प्रकारात लेखनही केले आहे. त्यांची काही प्रकाशित पुस्तकेः
कथाः
1) तुळशीत उगवली भांग
2) मर्मबंधातली ठेव
3) नाती झाली महाग
कादंबरी :
1) झराण
2) स्पर्श अमृताचा
3) आधारवड
कविता :
1) मातणार नाही मी
2) गेला विवेक कुणीकडे? (विडंबन)
3) आरोळ्या (चारोळी)
4) सुखाचे नको सोबती (दोहे)
5) चाहूल सूर्यास्ताची
वैचारिक स्फूटः
1) मूल्यशिक्षण एक मुक्त चिंतन
2) अक्षरधन
3) मशागत मूल्यांची
बालसाहित्यः
1) साखरेचा पेढा (कविता)
2) कथा या सांगू कुणा? (कथा)
3) वारा गाई गाणे (कविता)
4) वाचू नाचू आनंदाने (कथा)
5) ढगांना फुटले पाय (कविता)
6) हिरवी राने गाती गाणे (कविता)
7) गवसणी आकाशाला (कथा)
चरित्र / व्यक्तिचित्रेः
1) आपले राष्ट्रपती (चरित्रात्मक)
2) सुंभ जळला तरी….(व्यक्तिचित्रे)
3) रग तांबड्या मातीची…झुंज वाघाची (चरित्र)
4) माझी कोकणवारी (आत्मकथनात्मक)
संकीर्ण/समीक्षाः
1) एकनाथ आव्हाड यांच्या बालकविताःस्वरूप आणि शोध (समीक्षा)
2) English Grammar (शैक्षणिक)
3) The Garden Of Happiness (भाषांतर)
माननीय पुंडपाळ सर यांना मिळालेले पुरस्कार:
1) आदर्श तज्ज्ञ मार्गदर्शक, जि. प. रत्नागिरी 2005
2) ग. रा. तथा भाई नारकर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, रत्नागिरी 2008
3) बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर राज्यस्तरीय लक्ष्मी विष्णू उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 2011
4) वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव राज्यस्तरीय कृ. ब. निकुंब राज्यस्तरीय पुरस्कार 2016
5) सूर्यांश साहित्य संस्था, चंद्रपूर राज्यस्तरीय सूर्यांश पुरस्कार 2016
6) काव्यमित्र संस्था, पुणे राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2017
7) वेदसागर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, गारगोटी 2017
8) अंकुर साहित्य संघ, अकोला राज्यस्तरीय अंकुर पुरस्कार 2017
9) अ. भा. बालकुमार साहित्य संघ, उदगीर राजकुमार दत्तात्रय बेंबडे राज्यस्तरीय पुरस्कार 2020
10) न्यूजपेपर गंगाधर साहित्य परिषदेचा साहित्य भूषण पुरस्कार 2021
11) छ. चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, अहमदनगर 2022
12) सर्वद फाऊंडेशन, भांडूप (प) राज्यस्तरीय स्टार साहित्यिक पुरस्कार 2024
13) विद्यासागर संस्था, गारगोटी आकुबाई स. जठार राज्यस्तरीय
स्मृतिपुरस्कार 2023
14) दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान, चेंबूर राज्यस्तरीय पुरस्कार 2023
15) सप्तर्षी प्रकाशन व सप्तर्षी शैक्षणिक संस्था, मंगळवेढाचा सौ. काशिबाई घुले राज्यस्तरीय पुरस्कार 2023
16) कै. विकास पाटील सामाजिक प्रतिष्ठान, कणेगावचा कै. विकास पाटील स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2023
17) नाट्यश्री साहित्यकला मंच, गडचिरोली संस्थेचा राज्यस्तरीय मृत्युंजय वाङ्मय पुरस्कार 2023
.png)
.jpeg)




0 Comments