संदीप शेमणकर
राजापूर - तालुक्यातील सागवे, नाखेरे येथील रस्ता कामाच्या उत्खननात सापडलेल्या तोफेची दखल शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी घेतली आहे. शुक्रवारी त्यांनी सागवे परिसरात जाऊन सापडलेल्या तोफेची पाहणी केली.सदर तोफेचे त्याच परिसरात जतन व्हावे त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक सागवे येथे आयोजित करण्याबाबतचे सूतोवाच अपूर्वा सामंत यांनी केले.
सागवे, नाखेरे येथे रस्त्याच्या कामादरम्यान सुरु असलेल्या खोदकामात एक तोफ सापडली. सदर तोफ शिवकालीन युगातील असल्याची शक्यता आहे. सागवे, नाखेरे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलाशी संबंधित सरदार तेथे वास्तव्याला होते. त्यामुळे कदाचित त्यांच्या काळातील ती सापडलेली तोफ असावी, असे अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर सापडलेल्या तोफेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी घेतली. त्यांनी सागवे, नाखेरे येथे भेट देऊन तोफेची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे संघटक भरत लाड, शिवसेनेचे निरीक्षक संदेश पटेल, ओंकार पेडणेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी अपूर्वा सामंत यांनी आजूबाजूच्या परिसराचीही पाहणी केली.
खोदकामात सापडलेली तोफ हा ऐतिहासिक वारसा असून या तोफेचे त्याच भागात जतन झाले पाहिजे, अशी भूमिका अपूर्वा सामंत यांनी मांडली. त्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठकीचे सागवे येथे आयोजन करून सापडलेल्या तोफेचे सन्मानाने जतन व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
राजापूर तालुक्याला इतिहासकालीन वारसा लाभला आहे. ऐतिहासिक तालुका अशी ओळख आहे. त्या पार्श्वभूमीवर खोदकामात सापडलेल्या तोफेचे जतन त्याच परिसरात झाल्यास भविष्यात राजापूर तालुक्याचे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणखी महत्व वाढणार आहे.
सागवे, नाखेरे परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्या काळी प्रसिद्ध बंदर या परिसरात होते. मोठमोठी जहाजे या बंदरात लागत असत. त्यामुळे ही सापडलेली तोफ पाहता या परिसरात आणखी ऐतिहासिक ठेवा सापडू शकतो. त्याचा विचार करून पुरातत्व विभागाने या परिसरावर खास लक्ष केंद्रित करून सर्वेक्षण करावे आणि आवश्यकतेनुसार उत्खनन करावे, अशी मागणी होत आहे.
.png)
0 Comments