अभियंत्यांकडून पडझड झालेल्या कामाची पाहणी
संदीप शेमणकर
राजापूर - तालुक्यातील साखरी नाटे, नाटे भागात असलेल्या ऐतिहासिक घेरा यशवंतगडाच्या पडझड झालेल्या कामाची रत्नागिरीतील पुरातत्व विभागाच्या अभियंत्यांनी नुकतीच पाहणी केली. मागच्या आठवड्यामध्ये घेरा यशवंत गडाच्या नवीन कामाची पडझड झाली. या घटनेमुळे साखरी नाटे, नाटे तसेच आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नवीन काम झालेले आहे तर त्याची पडझड कशी झाली, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे आजूबाजूचे चिरेबंदी बांधकामही कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सूचना फलक लावण्यात आलेला नाही. किल्ल्याच्या कामाच्या संदर्भात ग्रामपंचायतींनाही कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.
नवीन कामाची पडझड होत असताना त्या ठिकाणी पर्यटक असते तर अनर्थ घडू शकला असता. त्यामुळे अशी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला. पुरातत्व विभागाचे अभियंते विशाल भरसट यांनी पडझड झालेल्या कामाची तसेच उर्वरित किल्ल्याच्या कामाची सविस्तर पाहणी करून आढावा घेतला. या संदर्भातला सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी नाटे सरपंच संदीप बांदकर, ग्रामपंचायत सदस्य निलेश बांदकर, शिवप्रेमी शरद घरकर, साखरी नाटे ग्रामपंचायत सदस्य मजीद सायेकर, पिंट्या कोठारकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळा कुबडे, संतोष चव्हाण, देवेंद्र बांदकर, प्रसाद मोदी, सुवर्णा बांदकर, मनाली करंजवकर, सचिन बांदकर, सिद्धेश मराठे आदी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रेमी उपस्थित होते.
.png)
0 Comments