मुंबई : ज्येष्ठ कवी आणि लोककवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्धी वर्षानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) दादर शाखेच्या वतीने दादर येथील साने गुरुजी विद्यालयात विशेष साहित्यिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. याच कार्यक्रमात साहित्यातील योगदान आणि कोमसापचा प्र. श्री. नेरुरकर बालसाहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल व मुंबई मराठी साहित्य संघ आणि कुमुद विद्यामंदिर, देवनार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सदानंद पुंडपाळ यांचा कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष श्रीमती नमिता कीर व केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. शाल, ग्रंथभेट आणि पुष्पगुच्छ देऊन सदानंद पुंडपाळ यांना गौरविण्यात आले. यावेळी श्रीमती नमिता कीर यांनी नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा समाजावर झालेला प्रभाव अधोरेखित केला.
कामगार, कष्टकरी आणि उपेक्षितांच्या वेदनांना शब्दरूप देणारे सुर्वे यांचे साहित्य आजही तितकेच समर्पक आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. प्रदीप ढवळ यांनीही उपस्थित सर्व साहित्यिकांना मार्गदर्शन केले व साहित्यसंस्था आणि तरुण कार्यकर्त्यांनी ही परंपरा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमात नारायण सुर्वे यांच्या कवितांचं वाचन, सादरीकरण करण्यात आले. 'शून्य बघितलेला माणूस'चे लेखक डॉ. तुषार प्रीती देशमुख यांनी आपला जीवन प्रवास उलघडून दाखवला. भाऊ पाध्ये आणि शंकर पाटील यांच्या कथांचे सादरीकरणही करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमसाप दादर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments