Header Ads Widget

maharashtra rain : मायबाप सरकार, करा थोडा इचार



मायबाप सरकार, करा थोडा इचार

अस्मानीनं मारलं, बळीराजा बेजार


जाईल नजर जिथंवर, दिसल पूरच पूर

हताश अन्नदाता दिसल बडवताना ऊर

पिकांनी त्याच्या चिखलात मान टाकलेली

रातीचा दिस करुन त्यानं जीवापरीस जपलेली

आशेनं बगल तुमच्याकडं, द्याल ना आधार?

मायबाप सरकार, करा थोडा विचार


पुसाल त्याचं डोळं येऊन त्याच्या बांधावर

शब्द मात्र पक्का द्या, कड काढायचा कुठंवर?

आदीच कर्जाचा डोंगर, संसार पुरात बुडलाय

अंगावरली कापडं आन, डोळ्यातबी पूर भरलाय

समदंच वाहून गेलं पुढलं वरीस कसं सरणार?

मायबाप सरकार, करा थोडा विचार


हमीभाव मिळत नसला तरी जगायचा कसाबसा

वेळ नसती अशी तर,त्यानंच दिलं असतं पसा पसा

तुमच्यामागं सरकारी गोतावळा, पत्रकारांची लगबग

कुणाला तरी दिसल का त्याच्या मनातली तगमग?

विचरल,फोटो काढाया आलाय का? दुखवलंय बिचारं

मायबाप सरकार, करा थोडा विचार


©रशिद इनामदार

9222517143 

काय घडलंय मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात ?

Post a Comment

0 Comments