Header Ads Widget

shubhman gil and k rahul : गिल-राहुलचा ऐतिहासिक पराक्रम: मँचेस्टरमध्ये लिहिलं सुवर्णपान!


क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा संकट डोकं वर काढतं, तेव्हा खरे हिरो उभे राहतात. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी असाच एक इतिहास रचला, जो क्रिकेटप्रेमींच्या मनात कायमचा कोरला जाईल. दोघांनी मिळून 417 चेंडूंत 188 धावांची भागीदारी करत केवळ स्कोअरबोर्डच नव्हे, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवे पर्व लिहिले आणि 21व्या शतकातील इंग्लंडमधील सर्वात मोठा भारतीय भागीदारीचा विक्रम रचला! क्रिकेटमधले काही क्षण असे असतात जे केवळ आकड्यांपुरते मर्यादित राहात नाहीत,  ते आठवणी बनतात, प्रेरणा बनतात! मँचेस्टरच्या मैदानावर शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी ज्या प्रकारे भारताचा डोलारा सावरला, ते पाहताना प्रत्येक क्रिकेटप्रेमीचा ऊर अभिमानाने भरून आला. भारताची अवस्था दोन बाद शून्य झाली तेव्हा बहुतेकांना वाटलं की हा भारताने हा कसोटी सामना गमवला, पण तेव्हाच उभे राहिले – शुभमन गिल आणि केएल राहुल. त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. 

कसोटीतील कसोटी: संयम, धैर्य आणि आत्मविश्वासाचं उदाहरण

गिल आणि राहुलची ही भागीदारी केवळ धावांची नव्हती. ती होती खंबीरतेची! इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा सामना करत, संपूर्ण दिवस खेळून काढणं ही सोपी गोष्ट नाही. केएल राहुलने 90 धावा करत संघाला संकटातून बाहेर काढलं, तर कर्णधार शुभमन गिलने 103 धावांची शानदार खेळी करत नेतृत्वाला साजेशी अशी खेळी केली. दोघांनी मिळून 417 चेंडू खेळत 188 धावांची अभेद्य भागीदारी रचली. हा विक्रम इतका खास आहे की, याने 2002 मध्ये राहुल द्रविड आणि संजय बांगर यांनी हेडिंग्ले येथे रचलेला 170 धावांचा (405 चेंडू) विक्रम मोडला. याआधी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी 1996 मध्ये 357 चेंडूंमध्ये 249 धावांची भागीदारी केली होती. मात्र गिल-राहुल जोडीने तोही विक्रम मागे टाकला. गिलने मालिकेतलं चौथं शतक ठोकत एक ऐतिहासिक कामगिरी केली. एका टेस्ट मालिकेत चार शतकं करणारा तो केवळ तिसरा कर्णधार ठरला. त्याने सर डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावसकर यांच्या पंक्तीत स्थान पटकावलं. शुभमन गिल, हा तरुण कर्णधार मँचेस्टरच्या मैदानावर इतिहास रचत आहे. या मालिकेत त्याने 722 धावा कुटल्या आणि चार शतकांसह क्रिकेटच्या दिग्गज सर डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावसकर यांच्यासोबत स्वतःचं नाव नोंदवलं. विशेष म्हणजे, कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत चार शतकं ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला, ज्याने वॉरविक आर्मस्ट्राँग, डॉन ब्रॅडमन, ग्रेग चॅपल, विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ यांना मागं टाकलं.

सामन्याचं नाट्य: जयस्वाल-सुदर्शन झटपट बाद, पण मग झाला चमत्कार!

प्रारंभात यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर बाद झाल्याने भारतीय चाहत्यांची चिंता वाढली. इंग्लंडने प्रथम डावात 669 धावांचा डोंगर उभारला होता. भारत पिछाडीवर होता, पण तिथून सुरू झाला ‘गिल-राहुल शो’! 2002 मधल्या राहुल द्रविड-संजय बांगर जोडीचा 170 धावांचा विक्रम मोडीत काढणं हे काही सहज साध्य नव्हतं. पण मँचेस्टरच्या मैदानावर ते घडलं  आणि ते साक्ष होतं एका नव्या युगाचं.

क्रिकेटचा आत्मा – लढा आणि सातत्य!

गिल आणि राहुल यांनी केवळ धावा केल्या नाहीत, तर खेळातला संयम, चिकाटी आणि राष्ट्रासाठी झगडण्याची भावना काय असते, हे दाखवून दिलं. 417 चेंडू खेळणं म्हणजे इंग्लंडच्या मैदानावर भारतीय जिद्दीचं जिवंत उदाहरण! अशा खेळी नव्या पिढीला क्रिकेटमधला खरा 'आत्मा' शिकवतात.

राहुलचं पुनरागमन: 500पेक्षा अधिक धावा आणि आत्मभान

केएल राहुलसाठी ही मालिका खास ठरली. 511 धावा करत त्याने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं. इंग्लंडमधील कसोटी मालिकेत 500 पेक्षा अधिक धावा करणारा तो गावसकर यांच्यानंतरचा दुसरा आशियाई सलामीवीर ठरला. राहुलच्या खेळातला तंत्रशुद्धपणा आणि गिलचा आक्रमक आत्मविश्वास, ही जोडी भविष्यात भारतासाठी मोलाची ठरणार यात शंका नाही.

ही भागीदारी फक्त धावांची नव्हती, ती होती भारतीय क्रिकेटच्या भविष्याची! गिलचा नेतृत्वगुण, राहुलचा संयम आणि दोघांचा आत्मविश्वास याने इंग्लंडच्या तेजतर्रार गोलंदाजांना नमवले. संकट कितीही मोठं असलं, तरी भारतीय क्रिकेटचं हृदय अजूनही धडधडतंय हे मँचेस्टरच्या मैदानावर त्यांनी दाखवून दिलं.

पुढील कसोटीवर नजर: ओव्हलमध्ये निर्णायक सामना

मँचेस्टर कसोटी ड्रॉ झाली असली, तरी मालिकेचा शेवट अजून झालेला नाही. इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे, पण ओव्हल कसोटीत भारताला बरोबरी साधता येईल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलंय. गिल, राहुल, पंत आणि जडेजा यांच्या कामगिरीवर मालिकेचं भविष्य अवलंबून आहे.

शुभमन गिल आणि केएल राहुल यांची मँचेस्टरमधील भागीदारी ही एक ‘क्रिकेट कविता’ होती – जिथे प्रत्येक चेंडू म्हणजे एक शब्द, प्रत्येक धाव म्हणजे एक ओळ आणि अखेरचं अपुरं शतक म्हणजे एक अधुरं पण प्रेरणादायी काव्य!

भारतीय क्रिकेटला एक नवीन नायक लाभलाय – शुभमन गिल! आणि एका दमदार साथीदारासह त्याने इतिहास कोरलाय.


Post a Comment

0 Comments