आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना हा मैदानापुरता राहिलेला नाहीय. तो मैदानाबाहेरही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या हे एकेकळाचे गुजरात टायटन्सचे दोन आधारस्तंभ. मात्र या दोघांमधल्या एका क्षणाने क्रिकेटप्रेमींचं लक्ष विचलीत केलंय आणि वेधलंय. टॉसवेळी झालेल्या नाट्यमय क्षणाने त्यांच्या चाहत्यांना गोंधळात टाकलंय. चांगले मित्र आणि खेळाडू असलेल्या या दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं, हा खेळातला तणाव होता, दबाव होता की नव्या समीकरणांची नादी? जाणून घेऊया.
न्यू चंडीगडच्या महाराजा यादवींद्र सिंग स्टेडियमवरचा हा क्षण क्रिकेटप्रेमींना विचारात पाडणारा आहे. आयपीएल 2025 चा हा एलिमिनेटर सामना. मैदानावर टॉसवेळी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या समोरासमोर आले. दोघेही एकेकाळचे सहकारी. हार्दिक पांड्याने हात पुढे केला, मात्र शुभमन गिलने त्याला प्रतिसाद दिला नाही. नेमका हाच क्षण कॅमेऱ्याने टिपला आणि त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्याही चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. शंकांवर शंका उपस्थित केल्या. हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलच्या मैत्रीला तडा गेला का ? त्यांच्यात कोणत्या गोष्टींमुळे तणाव वाढला ? इथपर्यंत सवाल उपस्थित केले गेले. खरं तर गिल आणि पांड्या यांनी 2022ची आयपीएल गाजवली होती. दोघांनी उत्तम कामगिरी करत 2022मध्ये गुजरातला पहिलं आयपीएल विजेतेपद मिळवून दिलं होतं. असं असतानाही दोघांमध्ये दुरावा का, असा प्रश्न दोघांचेही चाहते विचार आहेत.
आयपीएल 2022मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली शुभमनने गुजरातसाठी मोलाची भूमिका बजावली. 2023 मध्ये तर गिलने 890 धावांचा विक्रमी डोंगर उभारला. मात्र 2024 मध्ये हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केलं. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलवर सोपवण्यात आली. कदाचित ही घटनाही दोघांमध्ये तडा जाण्याला कारणीभूत असावी अशी चर्चा रंगलीय. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्यामध्ये पडलेल्या दुराव्याबाबत आणखी दोन कारणं चर्चेत आहेत. ती म्हणजे आयपीएल सामन्याचा दबाव आणि इंग्लंड कसोटी कर्णधारपदी शुभमन गिलीची झालेली निवड.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यातच मुंबई इंडियन्सने सामन्याची सुरुवातच धमाकेदार केली. रोहित शर्माने 50 चेंडूत 81 आणि हार्दिकने 9 चेंडूत 22 धावा कुटल्या. त्यामुळे गुजरात टायटन्ससमोर 228 धावांचा डोंगरच उभा राहिला. विशेष म्हणजे यंदाच्या आयपीएल हंगामातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या मुंबई इंडियन्सने उभारली. त्यातच मुंबई इंडियन्सच्या ट्रेंट बोल्टने शुभमन गिलला अवघ्या एका धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी हार्दिक पांड्याने मैदानातच जोरदार सेलिब्रेशन केलं आणि या वादात आणखी भर पडली.
मैदानावर हे सर्व सुरू असताना साई सुदर्शनने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने 49 चेंडूमध्ये शानदार 80 धावा केल्या. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. त्याला कुशल मेंडिस आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही चांगला हातभार लावला, मात्र जसप्रीत बुमराह आणि अश्वनी कुमारच्या अचूक गोलंदाजीपुढे गुजरात टायटन्सने नांगी टाकली आणि त्यांना 20 धावांनी पराभव पत्करावा लागला.
मैदानावरच्या खेळीच्या चर्चेपेक्षा जास्त चर्चा रंगली ती गिल आणि पांड्या यांच्यातल्या वादाची. एका चाहत्याने तर भारताचा कर्णधार बनताच गिलला ॲटिट्यूड आला अशी एक्स पोस्ट केली तर दुसर्या एका चाहत्याने हार्दिक आणि गिलमधील मैत्री आता फक्त आठवण राहील, असं लिहित नाराजी व्यक्त केलीय. सामना संपल्यानंतर दोघांनी एकमेकांचं अभिनंदन केलं, मात्र दोघांमधील फुटीची दरी स्पष्ट दिसू लागली. गिल आणि पांड्या यांनी अगदी मेहनतीनं क्रिकेटमध्ये स्थान निर्माण केलंय. त्यासाठी प्रचंड कष्टही घेतले आहेत, मात्र आजची घटना ही दोघेही दोन वेगळ्या मार्गांवर आहेत, अशी अधोरेखित करणारी आहे.
आयपीएल 2025 चा हा एलिमिनेटर सामना फक्त गुजरात आणि मुंबई यांच्यातला नव्हता, तर दोन मित्रांमधील नव्या समीकरणांचा अंदाज होता. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांच्यातील हा क्षण क्रिकेटप्रेमींच्या मनात कायम राहील. त्यांच्या खेळीने आणि नेतृत्वाने क्रिकेटप्रेमींच्या मनात कायमच स्थान निर्माण केलंय. आता मुंबई इंडियन्स पंजाब किंग्सविरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये भिडणार आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फायनलमध्ये त्यांची वाट पाहत आहे. पण प्रश्न कायम आहे. हो, गिल आणि हार्दिकमधील ही दरी भविष्यात भरून निघेल का? याची जास्त वाट क्रिकेट चाहत्यांना पाहावी लागणार आहे. दरम्यान गिलने आपल्या इन्स्टाग्रामवर प्यार के अलावा कुछ नहीं अशी पोस्ट शेअर करत हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केलाय.
.png)
0 Comments