Header Ads Widget

pradeep mogare : दुसऱ्यांसाठी धावले, स्वत:साठी थांबले, वैद्यकीय देवदूत प्रदीप मोगरे यांचे निधन


दुसऱ्यांसाठी धावले, स्वत:साठी थांबले, वैद्यकीय देवदूत प्रदीप मोगरे यांचे निधन

मुंबई - ऊन असो की पाऊस...ज्यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी अर्पण केले ते प्रदीप मोगरे. आज आपल्यात नाहीत. सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावणारे प्रदीप मोगरे आज मात्र स्वत:साठी थांबले. समाजसेवेचे व्रत घेतलेले आणि वैद्यकीय देवदूत समजले जाणारे प्रदीप मोगरे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या अशा अचानक जाण्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि मनाला चटकाही लागला आहे. 

'एक व्यक्ती अनेक भूमिका' ते साकारत होते. अनेक अडलेल्या नडलेल्या रुग्णांसाठी प्रदीप मोगरे हे खऱ्या अर्थाने देवदूत होते. त्यांना फोन केला आणि रुग्णसेवा झाली नाही असे कधी झाले नाही. त्यामुळे अनेकांसाठी प्रदीप मोगरे हे आधारवड होते. आयुष्याची सर्वाधिक वर्षे त्यांनी केईएम रुग्णालयात रुग्णसेवा, जनसेवा करण्यात वेचली. कोणत्या रुग्णाच्या नातेवाईकांना कुणाला भेटायचे, याची सविस्तर माहिती ते देत असत. त्याचबरोबर स्वत: पुढाकार घेऊन मदतसाठी धावत असत. रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याचीही ते सतत माहिती देत असत. प्रदीप मोगरे हे खऱ्या अर्थाने कार्यतत्पर समाजसेवक होते. त्यांच्या नसानसात दुसऱ्यांसाठी मदत भिनलेली होती. 

प्रदीप मोगरे हे रुग्णसेवा करायचेच त्याचबरोबर ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही ते कार्यरत होते. हिमालय मित्रमंडळाचे ते सभासद होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा क्रमांक २०४ चे उपशाखा प्रमुख होते. तसेच  मायभूमी फाऊंडेशनचे प्रमुख सल्लागार, कुणबी समाजोन्नती संघाचे प्रतिनिधी अशा विविध भूमिकांमध्ये ते वावरत होते. इतकेच नव्हे तर त्यांनी हिंदू संस्कृती रक्षक सेनेचे अध्यक्षपदही भूषवले होते. त्यांनी या सर्व ठिकाणी वाखाणण्यासारखे आणि आठवणीत राहील असे कार्य केले आहे. त्यामुळे प्रदीप मोगरे यांच्या जाण्याने अनेकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. तसेच यापुढे केईएम रुग्णालयात जाताना आपला हक्काचा माणूस रुग्णालयात नसल्याची भावना सतत टोचत राहणार आहे.

Post a Comment

0 Comments