रस्त्याच्या कामाचा श्रेयवाद ? ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष ?
श्री महाकाली मंदिरासमोरील रस्ता
आडिवरे - श्री महाकाली देवीचा नवरात्रोत्सव हा प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सात हजारो भक्त श्री महाकाली देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.मात्र याच श्री महाकाली मंदिरासमोरील रस्ता खराब झाल्याने प्रवाशांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या पुढाकाराने या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. त्यामुळे श्रेयवादाला तोंड फुटले आहे.
श्री महाकाली देवीच्या समोरील रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी ग्रुप ग्रामपंचायत वाडापेठेचे उपसरपंच सुनील रुमडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन लक्ष वेधले होते. सुनील रुमडे यांनी 25 जुलै 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना रस्त्याच्या कामाकडे ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याबाबत पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहारानुसार श्री महाकाली मंदिर ते श्री भगवती मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार होते. तसा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता. मात्र या रस्त्याचा ठेकेदार गेली तीन वर्षे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्याचबरोबर श्री महाकाली देवी मंदिराच्या समोरचा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग राजापूर यांच्याकडे दोन महिने पाठपुरावा करण्यात आला, असे उपसरपंच सुनील रुमडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवलेल्या पत्रावरून स्पष्ट होते. त्याचबरोबर या रस्त्याकडे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.
उपसरपंच सुनील रुमडे यांनी या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष का केले, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्व प्रकारची लोन मिळण्याचं एकमेव ठिकाण
त्याचबरोबर तक्रार करूनही या रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई का होत नाही, या ठेकेदाराला पाठीशी कोण घालत आहे, हेही प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्त्याची डागडुजी होण्यासाठी पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष का केले आणि आत्ताच या रस्त्याची डागडुजी का केली, असेही प्रश्न निर्माण झाले आहेत. या रस्त्याच्या डागडुजीसाठी निधी देण्यावरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असा दुजाभवा केला जात नाही ना, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे श्री महाकाली मंदिरासमोरील रस्त्याच्या डागडुजीचे श्रेय शिंदेंच्या शिवसेनेने घेतले असले तरी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने प्रयत्न केल्याचीही चर्चा आडिवरे परिसरात सुरू आहे. तसेच या रस्त्याच्या डागडुजीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष का केले, अशीही चर्चा आता सुरु झाली आहे.
0 Comments