anmol diwali : अनमोल हास्य, डोळ्यात आनंदाचे दीप...उजळली दिवाळी
खऱ्या आनंदाला..समाधानाला..आणि अशावेळी चेहऱ्यावर फुलणाऱ्या स्मिताचं मोल करणं खरंच अशक्य.त्या क्षणांचं साक्षीदार होण्याचं भाग्य आज लाभलं..त्यामुळे त्यांचीच नव्हे तर माझ्यासह माझ्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवत क्षणात मोलाचा सहभाग नोंदवणाऱ्या अनेकांची दिवाळी समाधानानं नक्कीच उजळून निघाली...संस्मरणीय ठरलीय यात अजिबात शंका नाही..खरंतर दिवाळीची लगबग असल्यामुळे इतर कोणीही येऊ शकलं नाही..मात्र माझ्यासोबत दरवेळीप्रमाणे.. कायम धाकट्या भावासारखा पाठीशी राहणारा.. "भाई, आप जैसा बोले.." असं म्हणत मला फक्त प्रोत्साहनच नव्हे तर मी घेतलेली जबाबदारी तत्परतेनं पुढं जाऊन निभावणारा अमित मौर्या आणि मी सकाळी दिवस उजाडायला प्रवासाला सुरुवात केली...हार्बर,मध्य आणि पश्चिम रेल्वे..शटलने वानगाव स्टेशन गाठलं.. तिथून वडापमध्ये बसलो,..फाट्यावर सरांनी पाठवलेला शाळेतील मदतनीस संतोष बाईक घेऊन आला..त्या बाईकवर आम्ही तिघं शाळेकडे निघालो..पण यावेळी वेगळ्या वाटेनं..त्यानं बाईक नेली..कारण हल्लीच झालेल्या पावसामुळे नेहमीचा जवळचा रस्ता चिखलात हरवलाय..आणि ज्या वाटेनं आम्ही निघालेलो..तोही त्यातल्या त्यात बरा होता..पण तिथंही अमितला काही अंतर चालत यावं लागलं..अखेर शाळेत पोहोचलो..सरांनी जोरदार तयारी केली होती..मुलांसाठी जेवण बनवणाऱ्या गावातील ताईंनी दारात मस्त रांगोळी काढली..त्यात दोन पणत्या लावण्यात आल्या..पण खरी गंमत पुढेच होती..ती म्हणजे शीव वाले सरांनी अत्यंत चांगल्या रितीनं दोन-तीन गोष्टींचा योग जुळवून आणला होता..पालकांची बैठक, मुलांना फराळ, अभ्यासपुस्तिका आणि गणवेशांचं वितरण, वर्षभर मुलांसाठी जेवण बनवणाऱ्या दिवाळीनिमित्त साड्यांची भेट, मदतनीस संतोषचा निरोप समारंभ आणि दुपारचं जेवण...त्या आयोजनाला इतका भरीवपणा आला. खूप भारी वाटलं..त्यात मुलं पालकांना बैठकीचं सांगायला विसरली होती..काहींनी सांगितलं पण त्यावर पालकांनी उत्तर दिलं नव्हतं..तर काहींचे पालक हे रोजगारासाठी गेले होते..पण संवाद एकदम गंमतीशीर वाटत होता..सर विचारत होते..पोरं संकोचून दबक्या आवाजात उत्तरं देत होती...सरांनी सांगताच मुलांनी बागेतील मस्त,सुंदर फुलं आणली..काही क्षणात त्याचे सुंदर गुच्छ तयार केले..मग एकामागून एक सर्व मुलांना फराळ, पुस्तक, गणवेश आणि पणतीचं वाटप करण्यात आलं..मी,अमित, वालेसर आणि गावातील मान्यवर, पालक महिलांच्या हस्ते ते करण्यात आलं..पुढचे कार्यक्रम पार पडले..एक वेगळीच प्रसन्नता..मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य, आनंद..आणि त्यांच्या बोलीभाषेत सुरु असलेली कुजबूज ऐकताना जाणवत होती..आम्ही फक्त फराळ वाटप करुन परतणार होतो..पण सरांनी केलेल्या नियोजनामुळे त्या आयोजनाला चार चाँद लागले...भविष्यातील मोठ्या उपक्रमांवर चर्चा केली.. आणखी एक पाऊल पुढं टाकत परिसरातील इतर पाड्यांवरच्या शाळांसह मोठे उपक्रम, स्पर्धा भरवण्यावर चर्चा झाली..पण खरंच सांगतो..सरांनी घातलेली साद..त्यात मी प्रामाणिक केलेले प्रयत्न..आणि तुम्ही दिलेलं मोलाचा प्रतिसाद..केलेलं सहकार्य..सढळ हस्ते केलेली मदत..यामुळे आजचं आयोजन अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं झालं..केलेले प्रयत्न सत्कारणी लागल्याचं समाधान पदरी पडलं..आणखी एक आवर्जून सांगावंसं वाटतंय..पाड्यातील मुलांसाठी सरांची धडपड कायम सुरू असते..त्यातून शाळेत वॉटर फिल्टर बसवण्यात आलाय..त्याचं उद्घाटन आहे..येत्या काही दिवसात जीर्ण झालेली शाळेची दुरुस्ती करून तिची रंगरंगोटी होणार आहे..शाळेच्या समोर बाग आणि शेती फुलतेय,आता फणस, आंबा, पेरु, चिकूची रोपंही लावण्यात येणार आहेत..खरंच सर ग्रेट आहेत.. आणि त्यांच्यासोबत या कामात मला खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळतेय..माझ्या मदतीला तुमचे हात पुढे येतायत..खूपच भारी वाटतं.. चार वर्षात एकही सामाजिक कार्यक्रम करू शकलो नव्हतो..पण वर्षभरात चार कार्यक्रम झाले..
रशिद इनामदार,पत्रकार, पुढारी न्यूज
9222517143
0 Comments