देशी गायी ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित, राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय!
Indigenous Cow As Rajmata-Gaumata: राज्यातील देशी गायींचं पालन-पोषण करण्याबाबत पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं आहे.
Cabinet Meeting Decision Updates: महाराष्ट्र सरकारनं देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये महाराष्ट्रातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती हा प्रस्ताव मान्य करून यासंदर्भातला शासन आदेश अर्थात जीआर जारी करण्यात आला आहे. शासन आदेशात यासंदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
‘प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लारी, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ). तथापि दिवसेंदिवस देशी कायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे’, अशी चिंता या आदेशाच्या सुरुवातीलाच व्यक्त करण्यात आली आहे.
‘देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहाराती स्थान, आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वाप तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्त्व विचारात घेता देशी गायींच्या संख्येत होणारी घट चिंताजनक बाब ठरत आहे. त्यामुळे देशी गायींचं पालनपोषण करण्यास पशुपालकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे’, असं यात म्हटलं आहे.
(साभार - www.loksatta.com)
राज माता या 'माँ जिजाऊ आहेत'; सरकारचा मतांसाठी लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा; काँग्रेस नेत्याची टीका
नागपूर : सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गायींना राजमाता-गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे निवडणुकीपूर्वी विरोधकांना सरकारला घेरण्याचा नवीन मुद्दा मिळाला आहे. या निर्णयामुळे विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या या निर्णयावर कडवट भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे. राज माता ही 'माँ जिजाऊ आहे' आणि गायला गोमाता म्हणून आम्ही त्यांना मानतोच. परंतु गोमातेला राज्यमाता म्हणायचा हा मतांसाठी लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. आणि निवडणुकीनंतर या गायीच्या गळ्यात फास बांधला जाईल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार यांनी म्हटले की, "भाजपसाठी राजकारण हा एक धंदा बनला आहे. निवडणुकांच्या तोंडावर गायीला वंदन करणे हे सरकारचे केवळ एक दिखावे आहे. निवडणुका संपल्यानंतर गायीच्या गळ्यात फास बांधला जाईल." त्यांनी सरकारवर आरोप केला की, गोमातेला राज्यमाता म्हणून मान्यता देऊन त्यांना मूर्ख बनवले जात आहे. "राजमाता म्हणजे "माँ जिजाऊ" आहे. आणि गायला राज्यमाता म्हणून संबोधण्याचे प्रयत्न हे जनतेला मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलतांना वाडेट्टीवार म्हणाले, एकीकडे गोमास व्यापाऱ्याकडून चंदा घ्यायचा, तिथे धंदा करायचा, त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही. आणि दुसरीकडे मात्र मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडलं असतांना गाईला पाणी आणि चारा देण्याकरिता तुमचा हाताला लकवा मारला. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर गाईला राज्यमाता म्हणून, माँ जिजाऊ चा अपमान करण्याचं पाप करत आहे. तसेच त्यांनी सरकारने जनतेला फसवण्याचे हे खेळ थांबवावे लागतील. असा इशाराही दिला. कुठे फेडाल हे पाप, आणि किती जुमले कराल, आता हे सर्व बंद करा. संपूर्ण महाराष्ट्र तुमचा कडे बघत आहे. असे वडेट्टीवार म्हणाले.
देशात गायीला राज्यमाता म्हणून जाहीर करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. याआधी २०१८ मध्ये उत्तराखंडने असा प्रकारचा ठराव मंजूर केला होता.
साभार - www.maharashtratimes.com
0 Comments