Header Ads Widget

Vinesh Phogat, Vinod kambli : जीवाला चटका लावणाऱ्या गोष्टी




Vinesh Phogat, Vinod kambli : जीवाला चटका लावणाऱ्या गोष्टी 


ऑलिम्पिकच्या पदकाच्या पदक तालिकेत तीन कांस्यपदकांसह भारत 63 व्या स्थानावर आहे. आजच दुपारी दुहेरी कांस्य पदक जिंकणाऱ्या मनू भाकरचं आपण दिल्ली विमानतळावर थाटात, जल्लोषात स्वागत केलं. रात्री महाराष्ट्राचा सुपुत्र कोल्हापूरचा पठ्ठ्या स्वप्निल कुसाळेचा वाढदिवस ऑलिम्पिक संघटनेच्या सदस्य नीता अंबानी यांच्या उपस्थितीत साजरा केल्याचंही पाहिलं... आणि या आनंदात आणखी एका पदकाची भर पडणार याची खात्री झालीच होती... आणि तेसुद्धा सुवर्ण पदकच असणार असा ठाम विश्वास भारतीयांसह जगभरातल्या क्रीडाप्रेमींना वाटत होता...मात्र दुपारी आलेल्या बातमीनं अवघा देश हादरून गेला...अवघं 100 ग्राम वजन अधिक भरलं म्हणून चक्क कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवलं...खरं तर हा निर्णय संशयाला, शंकेला वाव देणारा आहे...कारण त्यात चार वर्षांच्या मेहनतीचं, कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला...स्पर्धेत भाग घेतल्यापासून कितींदा वजन केलं असेल...तेव्हा नाही भरलं वजन जास्त..? नेमकं फायनलला येऊनच कसं काय वाढलं? त्यामुळे एकतर ती मशीन खराब असेल किंवा कुणाची तरी नियत खराब आहे असं माझं ठाम मत आहे. बरं, त्यातही अवघं शंभर ग्रॅम कमी करायला कितीसा वेळ लागला असता...असो...पण खरं तर विनेशनं कोट्यवधी देशवासीयांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलंय, जरी नियमांनी किंवा आणखी कोणत्या कारणांनी तिच्या गळ्यात मेडल पडलं नसेल...तरी असंख्य भारतीयांच्या गळ्यातलं ताईत आणि अनेक उदयोन्मुख खेळाडूंच्या मनात प्रामाणिक प्रयत्नांची मशाल पेटवण्यात ती यशस्वी झालीय हे निर्विवाद सत्य आहे...विनेश, तुला त्या मेडलपेक्षा बरंच काही मिळालंय...आणि तू भविष्यात टॉप ऑफ द वर्ल्ड असशील...ही भावना माझ्यासारख्या असंख्य क्रीडाप्रेमींच्या मनात आहे...      

दुसरी जीवाला चटका लावणारी गोष्ट म्हणजे.. एक अत्यंत उत्कृष्ट डावखुरा फलंदाज विनोद कांबळीचा काल व्हायरल झालेला व्हिडिओ...त्याची ती अवस्था पाहून खरंच मनात खूप कालवल्यासारखं झालं... त्याची खेळी... मैदानात पाय रोवून उभं राहून प्रतिस्पर्धी संघाला झुंजवत ठेवण्याची संयमी आणि तितकीच आक्रमक शैली...आजही आठवलं की वाटतं काल परवाचीच गोष्ट असावी. आजही त्याची आणि सचिनची मैदानावरची जोडी...आणि पेप्सीच्या जाहिरातीतलं ते प्रेमपत्र लिहीत...मेरी प्यारी अंजली (की अनिता, अर्चना) म्हणणं आठवतं...का झाली असेल इतकी बिकट अवस्था..? का आज त्याच्या सोबत कुणीही नाही? का तो एकाकी पडलाय? एकेकाळी अवघ्या जगानं त्याला डोक्यावर उचलून घेतलं...तोच अशा अवस्थेत का बरं असेल? अशा एक ना अनेक प्रश्नांनी मनाभोवती गोंधळ घातला...सगळ्यात अवघड आणि मन सुन्न करणारा प्रश्न...की त्याला सावरायला कोणीच का सरसावत नाही?

असो..या दोन घटनांनी जीवाला चटका लावलाय. त्या प्रश्नांसमोर माझ्यासारखे अनेक जण हतबल होऊन गप्प बसलेयत... 

साभार 
©रशिद इनामदार, 
पत्रकार, पुढारी न्यूज
9222517143

Post a Comment

0 Comments