ranbhajya : टाकळ्याच्या भाजीचा अनोखा केक, रानभाज्या महोत्सव साजरा
- सारिका माळी
रत्नागारी - संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील प्रा. आबा सावंत महाविद्यालयामध्ये रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला. संस्था अध्यक्ष प्राध्यापक आबा सावंत व संचालिका गीतांजली सावंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
कोकणामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात. या भाज्यांची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हावी, भाज्या कशा तयार केल्या जातात, भाज्यांची चव आणि भाज्यांचे औषधी गुणधर्म कोणते आहेत, याची माहिती मिळावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवामध्ये १२ गटांचा सहभाग
महोत्सवामध्ये सुरण, अळू, टाकळा, ओवा पान, भारंगी, केळीचे फुल, कोहाळा, रताळ्याची पाने, शेवग्याची पाने, कुरडू, अळूचे देठ, भारंगीची फुले, इत्यादी रानभाज्यांचा वापर करून अनेक प्रकारचे चविष्ट मेनू बनवण्यात आले होते.
सुरणापासून भाजी, भजी, वडी, अळूपासून अळूवडी, वडी, गाठे आणि भारंगीची भाजी, टाकळ्यापासून थालीपीठ, वडी, केक, ओव्याचे भजी, भारंगीची वडी, केळीच्या फुलाची भाजी, भारंगीचे भजी आणि भाजी, कोहाळ्याची भजी, रताळ्याच्या पानाचा रोल,पपनस सरबत,टाकळ्याचा पराठा,अळूची टिक्की,कुड्याच्या शेंगांची भाजी इत्यादी मेनू तयार करण्यात आले होते.
या महोत्सवामध्ये एसवायबीएच्या धनश्री लाड हिने टाकळ्यापासून केक बनवून प्रथम क्रमांक पटकावला. टीवायबीकॉमच्या ग्रुपने सुरणापासून वडी बनवून दुसरा क्रमांक पटकावला. एसवायबीए आणि टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला. तसेच असावरी सुर्वे यांच्या पपनसाच्या सरबताला स्पेशल अॅवॉर्ड देण्यात आला. गीतांजली सावंत आणि रमाकांत शिंदे यांनी परीक्षण केले.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
0 Comments