shivaji maharaj statue collapses : राजे, आम्हाला माफ करा
विशेष संपादकीय
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं तरी अंगात रक्त संचारतं. गर्वाने छाती ५६ पेक्षा जास्त इंचांनी फुगते. अभिमानाने मूठ छातीवर ठेवली जाते.मान ताठ होते. अख्खं जग छत्रपती शिवारायांच्या कर्तृत्वाने, पराक्रमाचे पोवाडे गाते. त्यांच्या गनिमी काव्याचा अभ्यास केला जातो. आदर्श, पराक्रमी आणि जनतेचा राजा म्हणून शिवरायांचा गौरव केला जातो. त्या शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळतो यासारखा दुसरा अपमान नाही. ज्या आदर्श राजाच्या नावाने राजकारण खेळता आणि राजाचा पुतळा जपू शकत नाही त्या रयतेच्या राजाचं नाव घेणे राजकारण्यांना शोभत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यापूर्वी आणि आता पडल्यानंतर नेत्यांनी राजकारणच सुरू केले आहे. पण एकाहीची हिम्मत झाली नाही रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता ना, मग ठणकावून जाब विचारण्याची अस्मिता गेली कुठे ? या ठिकाणी पक्षाचा मुद्दा येताच कामा नये होता. तो आला. याचाच अर्थ रयतेच्या राजाच्या नावाने राजकरण करण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही , हे नेत्यांनी सिद्ध करून दाखवले. जो राजा वायूच्या वेगाने पळतो त्या राजाचा पुतळा वाऱ्याच्या वेगाने पडावा आणि त्याबाबत सारवासारव करणे हे लज्जास्पद आहे. चौकशी करू आणि यापेक्षा मोठा पुतळा उभारू असे सांगणे म्हणजे पुतळा उभारताना केलेल्या दुर्लक्षाची साक्ष देणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत. मग आपल्या आराध्य दैवताचा पुतळा कोसळतो त्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटामाटात, नट्यांना स्टेजवर आणून दहीहंडी साजरी करतो आणि याच स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा दिली जाते. यावरूनच राजकारण्याच्या मनात शिवरायांबाबत किती आदराचे स्थान आहे याची कल्पना येते. शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर किती राजकारण्यांना वाटले की जाऊन परिस्थितीची पाहणी करावी. यांनी भेट दिली, त्यांनी चर्चा केली, त्याने संवाद साधला अशी थातूरमातूर उत्तर दिली गेली. तडक त्या जागेवर का गेला नाहीत ? सर्वसामान्यांनो, राजकीय नेत्यांच्या लेखी छत्रपती शिवाजी महाराजांचं काय स्थान आहे, हे यावरून लक्षात येते. छोट्या मोठ्या गोष्टीवर रस्त्यावर उतरणारे शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर पेटून उठले नाहीत...कारण आम्ही आमची अस्मिता विकली आहे. कुठे आणि कशी, सांगायची गरज नाही.
स्वराज्याचा मंत्र छत्रपती शिवरायांनी दिला. राजांच्या विचारांनी अनेक भारावून गेले. त्यांच्या आदर्श गिरवला. अशा आदर्श राजाचा वापर सोयीस्करपणे केला जातो, यायासारखं दुर्दैव नाही. छत्रपती शिवरायांनी उभारलेले गड - किल्ले अनेक वर्षं अनेक संकटांचा सामना करत आहेत. मात्र अवघ्या सहा महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळतो ही बाब महाराष्ट्रासाठी कदापि भूषणावह नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राण तळहातावर ठेवून स्वराज्य निर्माण केले त्या शिवरायांचा पुतळा उभारताना केलेली हयगय अक्षम्य आहे. अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा वापर राजकीय पक्ष मोठ्या खुबीने करतात. मात्र एकही राजकीय नेता छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही गुण अंगीकारत नाही. कोणत्याही राजकीय नेत्याची सभा असो, संमेलन असो, व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असतो. हार घातला जातो. हर हर महादेवच्या घोषणा दिल्या जातात. तुतारी वाजवल्या जातात. नावापुरता मुजरा केला जातो. मात्र या सभांमध्ये, भाषणांमध्ये छत्रपती शिवरायांच्या गुणांचा, कर्तृत्वाचा, इतिहासाचा, रयतेच्या राजाच्या कार्याचा अभावानेच उल्लेख होतो. फक्त आज छत्रपती शिवाजी महाराज हवे होते...छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी अमूक केले असते, तमुक केले असते...अरे लाजा वाटायला पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते असे फक्त म्हणायचे आणि वापर मात्र आपल्या परीने करून घ्यायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळायचे हीच राजनीती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की मराठी माणूस भारावून जातो...आणि त्यात चूक काही नाही. मात्र निवडणुकीच्या तोडांवर महापुरुषांच्या नावाने राजकरण्यात राजकीय नेत्यांचा हात कुणीही धरणार नाही. हीच महाराष्ट्राची आणि देशाची शोकांतिका आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधणार ही घोषणा महाराष्ट्रासाठी, मराठी मनासाठी, मराठी माणसांसाठी शिरपेचात तुरा खोवणारी. ही घोषणा पुढे अरबी समुद्राच्या लाटांमध्ये कशी गटांगळ्या खात बुडाली याचा इतिहास सर्वज्ञात आहे. अरबी समुद्रात स्मारक उभारण्याच्या घोषणांची फुशारकी मारली गेली. मात्र ही घोषणा पूर्ण करू शकली नाही याची लाजही वाटली नाही.
सिंधुदुर्गमधील मालवणीमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे लोकापर्ण झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलाने आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वच एवढे महान आहे. मात्र पुतळा उभारणाऱ्या हातांना हे का दिसले नाही? आपण ज्यांचा पुतळा उभारत आहोत त्यांच्या पुतळ्या उभारणीच्या कामात हलगर्जीपणा होत आहे याचे भान राहिले नाही का ? आता सर्वांनी नेव्हीकडे बोट दाखवली आहेत. मात्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारले ते आर्मी एवढे दुर्लक्ष करू शकते ? नेव्हीने येऊन घटनेची माहिती घेतली आहे. मागे पुढे सत्य समोर येईलच. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याचे दु:ख अवघ्या महाराष्ट्राच्या काळजात कायमचे टोचत राहील. ही वेदना सतत सळत राहील.
0 Comments