'एका डरकाळीमुळे हॉस्पिटल मंजूर'
आमदार राजन साळवींचा टोला
प्रतिनिधी
राजापूर - वाटूळ येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे श्रेयवादाचा सामना रंगला आहे. मात्र माझ्या एका डरकाळीमळे घाईघाईत हॉस्पिटल मंजूर करण्यात आले, असे रोखठोक प्रत्युत्तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी दिले आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील वाटूळ येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी खास बाब म्हणून मंजुरी दिली. यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पुढाकार घेतला अशी चर्चा सुरू झाली. त्यावेळी राजन साळवी राजकारणातून निवृत्ती घेणार का, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते.
'मी फक्त राजकीय निवृत्तीची भाषा केली आणि संपूर्ण सरकार जणू कामाला लागले. घाईघाईत राजापूर येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सरकारने खास बाब म्हणून मंजूर करून दिले. "ये डर अच्छा लगा" पण इतकीच जर माझ्या राजकीय निवृत्तीची घाई असेल तर रत्नागिरी शहरात जी रस्त्यांची आणि पिण्याची पाण्याची दयनिय अवस्था करून ठेवली आहे ना ती अशाच पद्धतीने सुधारून दाखवा, मी निवृत्ती घ्यायला तयार आहे,' असे रोखठोक प्रत्युत्तर आमदार राजन साळवी यांनी दिले.
'सलग पाच वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात राहणाऱ्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर राजापूरची आठवण यावी, हा निव्वळ फुसका बार ठरला आहे,' असा टोलाही राजन साळवी यांनी लगावला आहे.
'प्रत्यक्षात राजापूjमधील वाटtळ येथील जागा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मी निवडली होती. त्या जागेसाठी गेले काहr वर्षे मी सतत प्रयत्न करत होतो. ती जागा मिळाल्यानंतर तसा प्रस्ताव मी तयार करून शासनाला सादर केला. त्याचे सर्व कागदोपत्री पुरावेदेखील माझ्याकडे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्या प्रस्तावाला चालना मिळाली. आवश्यक ते सर्व परवाने त्यांनी दिले. प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यात आले. तेव्हापासून हा विषय रखडून ठेवण्यात आला होता. जाणूनबुजून हा अत्यंत महत्त्वाचा विषय मागे ठेवण्यात आला. त्याला फक्त आणि फक्त राजकीय महत्वकांक्षा होती, हे आता स्पष्टपणे समोर आले आहे,' असेही राजन साळवी म्हणाले.
'गेले अडीच वर्षे उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांची इतकीच मोठी ताकद जर सरकारमध्ये होती तर मग त्यांनी पहिल्या सहा महिन्यात हॉस्पिटल का मंजूर करून घेतले नाही? मुख्यमंत्री तुमचे, आरोग्यमंत्री तुमचे, तुम्ही स्वतः सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, मग इतका उशीर का झाला? विशेष बाब म्हणून तेव्हाही मंजुरी घेऊ शकत होतात ना? मग ही विशेष बाब कुठे शेपूट घालून होती? आता सर्व काही हातातून निसटून जात आहे आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. यापुढे आपल्याकडे संधी नाही, हे लक्षात आल्यावर घाई सुरू झाली,' अशी सणसणीत टीकाही राजन साळवी यांनी केली आहे.
'राजन साळवी काय करू शकतो, हे माहीत असल्याने त्यांना आता राजापूरच्या जनतेचा कळवळा उफाळून आला. आपले वजन वापरण्याची नामुष्की ओढवली. त्यातूनच विशेष बाब म्हणून हॉस्पिटलला मंजुरी घेण्याची वेळ आली. जर मी निवृत्ती घेण्याचे आव्हान दिले नसते तर अजून कित्येक वर्षे गेली असती. मला भरपूर समाधान आहे, की माझ्या एका वाक्याने हे घडू शकले. "ये डर अच्छा लगा", अशी खरपूस टीकाही राजन साळवी यांनी केली.
'माझ्या निवृत्तीची इतकीच घाई झाली असेल तर आता रत्नागिरी शहराची जी अवस्था करून ठेवली आहात ना, ती जरा सुधारा. शहरातील रस्ते तसेच पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिक ज्या पद्धतीने टाहो फोडत आहेत, त्याकडे अशाच पद्धतीने विशेष बाब म्हणून लक्ष देऊन तातडीने लोकांचे जीवन सुसहाय्य करा आणि जर हिम्मत असेल तर रत्नागिरी शहरात तसेच संपूर्ण मतदारतसंघात फिरून अवस्था बघा. नंतर मला सांगा. मी निवृत्ती घ्यायला तयार आहे. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे,' असे रोखठोक प्रत्युत्तर राजन साळवी यांनी दिले.
0 Comments