Gautam Gambhir : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळणार?
Gautam Gambhir On Virat Kohli and Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघ येत्या २७ जुलैपासून श्रीलंकेविरोधात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा भारताच्या एकदिवसीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर टी-२० संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय संघातला नवोदित युवा खेळाडू शुबमन गिल दोन्ही संघांचा उपकर्णधार असेल. दरम्यान, या दौऱ्यासह टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात करणार आहेत. श्रीलंका दौऱ्याच्या आधी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर पत्रकार परिषदेला सामोरे गेले. या पत्रकार परिषदेत गंभीर यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली या दोघांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. हे दोन्ही खेळाडू २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतात, असं गंभीर यांनी म्हटलं आहे.
गौतम गंभीर म्हणाले, मला कल्पना आहे की हे दोन खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये काय करू शकतात. त्यांची गुणवत्ता त्यांनी एवढ्या वर्षांमध्ये सिद्ध केली आहे. टी-२० विश्वचषक असो अथवा एकदिवसीय, या दोन खेळाडूंची मोठी ताकद आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये अजून बरंच क्रिकेट बाकी आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियात मोठी कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या स्पर्धांसह विराट व रोहितने त्यांचा फिटनेस कायम राखला तर ते दोघेही २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतात.
विराट-रोहितच्या निवृत्तीबाबत गौतम गंभीर काय म्हणाले?
दरम्यान, यावेळी गंभीर यांना रोहित व विराटच्या टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले हा वैयक्तिक निर्णय आहे. त्या दोघांमध्ये किती क्रिकेट बाकी आहे ते मी सांगू शकत नाही. परंतु, विराट व रोहितने जे काही साध्य केलंय ते पाहता आणि अलीकडच्या काळातील त्यांचा खेळ पाहता असं वाटतं की त्यांच्यात अजून बरंच क्रिकेट बाकी आहे.
भारताचे नवे प्रशिक्षक म्हणाले, खेळाडू नेहमी माझी साथ देतील ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट असेल. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहिलं पाहीजे याची मी काळजी घेईन. मी एका यशस्वी संघाची सूत्रं हाती घेतली आहेत. या काळात मी आपल्या गोलंदाजांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करेन, त्यांना जास्तीत जास्त आराम मिळेल याची काळजी घेईन.source - www.loksatta.com
0 Comments