Ajit Pawar : गुलाबी राजकारणामागे दडलंय काय?
Ajit Pawar NCP : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रात केवळ एकच खासदार निवडून आला. राज्यात महायुतीची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता महायुतीतील पक्ष, प्रामुख्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्य सरकारने नुकताच आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात लोकांना आकर्षित करतील अशा काही योजना सादर केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राज्य सरकारही या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करतंय. अजित पवार याबाबतीत आघाडीवर आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे राज्य सरकारची लाडकी बहीण योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळे तालुके व जिल्ह्यांच्या ठिकाणी ते महिलांबरोबर संवाद साधत आहेत. अजित पवार यांनी ‘संवाद लाडक्या बहिणींसोबत’ ही मोहिम देखील हाती घेतली आहे आणि या मोहिमेंतर्गत अजित पवार राज्यभर फिरू लागले आहेत. दरम्यान अहिल्यानगर येथे महिलांबरोबर बातचीत करत असताना एका महिलेने अजित पवारांना त्यांच्या गुलाबी जॅकेटबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तराने कार्यक्रमाच्या ठिकाणी जमलेल्या सर्व महिलांमध्ये एकच हशा पिकला होता.
एका महिलेने अजित पवार यांना प्रश्न विचारला की “मागील महिन्याभरापासून तुम्ही सतत आम्हाला गुलाबी जॅकेटमध्ये दिसताय, तुम्ही सतत गुलाबी जॅकेट का घालता? बॅनरपासून सगळीकडेच गुलाबी रंग दिसतोय. तुम्हाला गुलाबी रंग खूप आवडतो का?” यावर अजित पवार म्हणाले, “तुम्ही सर्व महिला सतत वेगवेगळ्या साड्या नेसत असता. परंतु, त्या साड्यांमध्ये एखादी अशी साडी असते जी साडी पाहून तुमच्या जवळच्या सगळ्या मैत्रिणी, सहकारी आणि घरातली मंडळी तुम्हाला सांगतात की ही साडी तुमच्यावर खूप जास्त खुलून दिसते. तेव्हा ती साडी तुम्ही सतत नेसत असता. त्याचप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांनी देखील मला सांगितलं की दादा, हे जॅकेट तुम्हाला लय चांगलं दिसतं. त्यामुळे मी ते जॅकेट सतत घालू लागलो. गुलाबी जॅकेट घालण्यामागे दुसरं काहीच कारण नाही. आपल्याला जे आवडतं ते आपण करायचं, फक्त ते दुसऱ्याला त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घ्यावी, एवढाच या सगळ्यातून अर्थ घ्यायला हवा.”
आहिल्यानगर येथे ‘संवाद लाडक्या बहिणींसोबत’ कार्यक्रम पार पडला
अजित पवार राज्यभर महिलांचे जे मेळावे घेत आहेत, त्या ठिकाणी असणारे होर्डिंग्स, मंडप या सर्व ठिकाणी गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. तसेच अजित पवार गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करून या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यामुळेच अनेकांना या गुलाबी रंगाबाबत प्रश्न पडला होता. आहिल्यानगर येथे आयोजित ‘संवाद लाडक्या बहिणींसोबत’ या कार्यक्रमात एका महिलेने अजित पवारांना गुलाबी रंगाच्या वापराबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी गंमतीशीर उत्तर दिलं. source - www.lolsatta.com
0 Comments