adivare road damage : 'रस्ता सुधारा, अन्यथा दणका'
श्री महाकाली देवीसमोरील रस्त्याची दुरवस्था
रवींद्र चव्हाण आणि नारायण राणेंची ग्रामस्थ घेणार भेट
रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा
- संदीप शेमणकर
आडिवरे - राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील सागरी महामार्गावरील आडिवरे येथील रस्त्याची दुरवस्था झाली असून अनेक अपघात घडत आहेत. या रस्त्याची वेळीच दुरुस्ती करण्या यावी यासाठी आडिवरे येथील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांची भेट घेणार आहे. मात्र रस्तादुरुस्ती झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
वाडापेठ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आडिवरे येथील श्री महाकाली देवस्थानच्या समोरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेषता या खड्ड्यात अडकून अनेक महिला दुचाकीस्वार दुखापतग्रस्त होत आहेत.
श्री महाकाली देवस्थानच्या समोरील या रस्त्यावर दरवर्षी मोठ मोठे खड्डे पडतात, मात्र दरवर्षी तात्पुरती मलमपट्टी केली जाते. या महामार्गावरील वाडापेठ एसटी स्टँड ते भगवती मंदिर या तीनशे मीटरच्या रस्त्यासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे, असे स्थानिक लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. दोनच वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र या भागातील हे डांबरीकरण पूर्णतः वाहून गेल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यावर जांभे दगड आणून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न बांधकाम खात्याने केला होता, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
वाडापेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील रुमडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या रस्त्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करा, अशी वारंवार विनंती करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे. आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री महाकालीचे देवस्थान असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक येत असतात, मात्र देवस्थानासमोरील या रस्त्याची दुरवस्था पाहून त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेला सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता तात्काळ करावा, अशी विनंती केलेली असतानादेखील अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. पुढील आठ दिवसांत या रस्त्यासाठी ठोस उपाययोजना केली गेली नाही तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. तसेच याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
0 Comments