Header Ads Widget

eknath shinde : 'लाडकी' योजना सरकारची


eknath shinde : 'लाडकी' योजना सरकारची

खास प्रतिनिधी
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत आहे, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी अटी आणि शर्ती असल्यामुळे  महिलांना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. राज्यातील अनेक तहसील कार्यालयाबाहेर आणि तलाठी कार्यालयाबाहेर कागदपत्रांसाठी महिला गर्दी करू लागल्या आहेत तर काही ठिकाणी अधिकारी महिलांकडून पैशांची मागणी करत असल्याचे दिसून येत  आहे.  लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारची लाडकी बहीण ही योजना लाडकी असली तरी महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी लागू करण्यात आलेली मुदत संपल्यामुळे आणि अनेक बहिणींना योग्य ती कागदपत्रांची जुळवाजुळव करणे शक्य न झाल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुदतवाढ दिली आहे. लाभार्थी महिलांना आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तंबी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. त्यामुळे या योजनेच्या कुणी पैशांची मागणी केली तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 


लाडकी बहीण योजनेवर मनसे नाराज?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण या योजनेवर टीकाही होत आहे. महिलांना महिन्याला पैसे देण्यापेक्षा मुलींना मोफत शिक्षण द्या आणि त्यांना सक्षम करा अशी टीकाही सोशल मीडियावर रंगली आहे. त्यातच आता मुस्लीम समाजातील ज्या व्यक्तीला दोन पत्नी आहेत अशा कुटुंबाला आणि दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये, अशी मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. देशात लवकरच लोकसंख्येचा स्फोट होणार असून वाढत्या लोकसंख्येचा भार, जे लोक दोनपेक्षा जास्त अपत्य होऊ देत नाहीत, त्यांच्यावर पडतो आहे. त्यांच्या कराचा पैसा दुसरीकडे खर्च होतो, अशा महिलांना या योजनेचा लाभ दिल्यास, खरे गरजू मागे राहतील असे मत मनसेने व्यक्त केले आहे. 

Post a Comment

0 Comments