mumbai - goa highway : खड्ड्यात गेला मुंबई-गोवा महामार्ग
अपघातांच्या संख्येत मोठी वाढ, सरकार लक्ष देणार का?
- संदीप शेमणकर
संगमेश्वर - मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी पिक अप शेड ते संगमेश्वरदरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे पडले असून मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यात गेला का आणि सरकार केव्हा लक्ष देणार, असे प्रश्न प्रवाशांना पडले असून अपघातांची संख्ख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागतात. मोठे खड्डे आणि पाण्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचे प्रवाशांचे आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आणि महामार्ग अपघातविरहित करण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा परिणामांची पूर्णपणे जबाबदारी संबंधित विभागाने स्वीकारावी, अशी मागणी प्रवासी, पादचारी आणि वाहनचालकांनी केली आहे.
या महामार्गावरुन शाळा, कॉलेज, नोकरी, दवाखाना, सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे महामार्गावरील खड्डे वेळीच भरण्यात यावे आणि प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा, अशीही मागणी प्रवाशांनी केली आहे. पावसाला आताच सुरुवात झाली आहे अजून पूर्ण पावसाचा हंगाम बाकी आहे, त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या कोणाचाही हकनाक बळी जाऊ नये, अथवा अपघातामुळे कोणीही गंभीर जखमी होऊ नये यासाठी या मार्गावर पडलेले भलेमोठे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे, असे धामणीतील सचिन यादव यांनी सांगितले. तसेच या संदर्भात लवकर निवेदन देणार असल्याचेही सचिन यादव यांनी सांगितले.
.png)
0 Comments