Header Ads Widget

EKNATH SHINDE : 'ठाकरे गटाचं नाव आता उठा बसा संघटना'


EKNATH SHINDE : 'ठाकरे गटाचं नाव आता उठा बसा संघटना'

मुंबई - शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये वरळीत शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शिवसेना ठाकरे गटाचं नाव बदलून आता उठा बसा संघटना ठेवायला पाहिजे, असं म्हणत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस काठावरही पास झाली नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत कोण जिंकलं? कोणाचा पराभव झाला हे स्पष्ट आहे. खरी शिवसेना कोणाची? याचा निकाल या निवडणुकीत जनतेने दिला आहे. आपण निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात गेलो होतो. मी तुम्हाला आठवण करून देतो की, यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लोकांनी ट्रेलर दाखवला होता. तेव्हा सर्वात जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या होत्या. तसेच शिवसेना शिंदे गट २ हजार २०० ग्रामपंचायतीमध्ये जिंकला होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे गट कितव्या नंबरवर होता? ते कोणालाही माहिती पडलं नाही. त्यामुळे खरी शिवसेना कोण? हे सांगण्याची आवश्यकता नाही”, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली.

“वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा आपला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाने दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. ठाकरे गट उठा बसा संघटना आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ३२८ जागा लढवल्या होत्या. पण काँग्रेस काठावरही पास झाली नाही. मात्र, देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं की काय? एवढा उन्माद केला. १२ जागांवर पराभव झालेला ठाकरे गट आता जीत का जश्न मना रही है. त्यांना आता अशीच भाषा वापरावी लागेल. गिरे तो भी टांग उपर, हे शब्द त्यांना लागू होतात. एखादं लहान बाळही सांगेल की, ठाकरे गट काँग्रेसच्या व्होट बँकेमुळे जिंकली आहे. काँग्रेसच्या व्होट बँकेने ठाकरे गटाला तारलं आहे. एवढ्या जागा लढवून देखील फक्त ९ जागा आल्या. सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडणारे हे लाचार आहेत”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल

“औरंगजेबाची वाहवा करणाऱ्यांच्याबरोबर तुम्ही बसता. मतांसाठी कुठून फतवे निघाले? हे सर्वांना माहिती आहे, हा मेळावा वरळीमध्ये होत आहे. या ठिकाणी ठाकरे गटाला निवडणुकीत जेमतेम ६ हजारांचा लीड मिळाला. आता काही म्हणत होते, आम्ही या ठिकाणी ५० हजारांचा लीड घेणार. आता कुठं गेले लीड देणारे. निवडणुकीत पराभव करतो असं म्हणणारे आता कुठं गेले? आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा. नरेश म्हस्के खासदार होण्याच्या आधी म्हणाले मी महापालिकेला उभा राहतो, माझ्या समोर त्यांना उभ राहूद्या. मग आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत, अशी अवस्था झाली”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

Post a Comment

0 Comments