खेर्डी येथील सुरेंद्र शिगवण यांच्या निधनानंतर मुले झाली निराधार
- संदीप शेमणकर
चिपळूण - 'खेळ कुणाला दैवाचा कळला, या मराठी देवता चित्रपटातील गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव खेर्डी शिगवणवाडी येथील आई बापाचे छत्र गमावलेल्या त्या तीन भावंडांना आला आहे. नियतीने त्यांच्या नशिबात हे भोग का लिहिले असा प्रश्न त्यांच्यासह परिसरातील लोकांनाही पडला आहे.
काही दिवसापूर्वी आईचे निधन झाले आणि नुकतेच एका अपघातात त्यांचे वडील सुरेंद्र शिगवण यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोरकी झालेल्या या तिन्ही भावंडांचे मातृ-पितृ छत्र हरपल्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले आहे. खेर्डी येथील या घटनेने सर्वांचे हृदय हेलावून टाकले आहे. चिपळूण शहरानजीकच्या खेडी शिवाजीनगर येथे एका इमारतीच्या प्लास्टरचे काम करताना दुसऱ्या माजल्यावरून पडून खेर्डी येथील सुरेंद्र शिगवण यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजता घडली. लाकडी परांजा तुटल्याने ही घटना घडली. यामध्ये सुरेश मारुती शिगवण (३६. खेडी- शिगवणवाडी) आणि पूनम दिलीप साहा (४० खेडी-शिवाजीनगर, मूळची बिहार) या दोघांचाही मृत्यू झाला. मात्र या दोघांच्या मृत्यूनंतर दोन्ही कुटुंबं दुःखाच्या खाईत लोटली गेली, परंतु त्यातील सुरेंद्र शिंगवण यांच्या कुटुंबाची कहाणी अतिशय दुर्दैवी आहे. सुरेंद्र शिगवण यांना तीन मुलं असून या मुलांची नशिबाने जणू थट्टाच मांडली आहे. काही महिन्यांपूर्वी मुलांच्या आईचे निधन झाले. आता त्यांचा आधारवड असलेले त्यांचे वडीलच गेल्याने या लहानग्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेडी शिगवणवाडी येथील रहिवासी असलेले सुरेंद्र शिगवण हे परिसरात बांधकाम व प्लास्टरची छोटी-मोठी कामे करत असतं. गेल्या वर्षी पत्नीच्या निधनानंतर ते तुटून गेले होते. पण मुलांचे भवितव्य डोळ्यांसमोर ठेऊन ते उभे राहिले. बांधकाम व मजुरीची कामे मिळवून पत्नीच्या पश्चात आपल्या तीन मुलांसमवेत संसाराचा गाडा रेटत होते. यातच अपघाती मृत्यू झाला. मागील तीन वर्षात शिगवण यांच्या कुटुंबातील आई, भाऊ व पत्नी सलग चौघांचा मृत्यू झाल्याने हे कुटुंब अक्षरशः भेदरलेले आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणासह आपल्या नवीन घराचे स्वप्न पाहिलेला कर्तापुरुषच पडद्याआड गेल्याने या कुटुंबीयांसमोर अंधार पसरला आहे. दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन भावंडे उडघ्यावर आली आहेत.
एकापाठोपाठ एक कुटुंबातील सदस्य पडद्याआड गेले. सुरेंद्र शिगवण यांनीही नवीन घराचे स्वप्न पाहिले होते, त्यांनी ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला. घराच्या पायथ्याचे काम पूर्ण झाले. त्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत होते. मात्र स्वप्न पूर्ण करण्याच्या घाईत त्यांचाही अपघाती मृत्यू झाला आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न अर्ध्यावरच मोडले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
पोरक्या मुलांना सहकार्याची गरज आहे. मृत्यू पावलेल्या सुरेंद्र शिगवण यांच्या तीन लहान मुलांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची गरज आहे. तुमचा एक मदतीचा हात या पोरक्या निराधार बालकांना जगण्याची नवी उमेद देऊ शकतो.
त्याचबरोबर कुणबी समाजातील बांधवांनी या मुलांना मायेचा हात देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या मुलांना मदतीचा हात सर्वांनी द्यावा. त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आडिवरे टाइम्सद्वारेही करण्यात येत आहे.
.png)
0 Comments