Header Ads Widget

...आणि मुक्या प्राण्याचे जीव वाचले : वाचवणाऱ्यांचे कौतुक झाले


...आणि मुक्या प्राण्याचे जीव वाचले :  वाचवणाऱ्यांचे कौतुक झाले

दळे येथे टॉयलेटच्या उघड्या टाकीमध्ये पडलेल्या वासराला लाडांकडून जीवदान

- संदीप शेमणकर

राजापूर - राजापूर तालुक्यातील जैतापूर दळे सडेवाडी सानिका लाड आणि कृष्णा लाड यांनी प्रसंगावधान दाखवत टॉयलेटच्या खोल टाकीत पडलेल्या वासराला टाकीच्या बाहेर काढत जीवदान दिले.

सडेवाडी येथील  रेशम लाड यांना आपल्या घराच्या वरच्या मजल्यावरील पार्लरच्या खिडकीमधून मागील बाजूला नवीन घराचे काम सुरू असलेल्या  टॉयलेटच्या टाकीमध्ये काहीतरी  तरंगताना दिसले. त्यांनी याची माहिती त्यांचे दीर कृष्णा लाड यांना दिली. कृष्णा यांना टाकीमध्ये वासरू पडल्याचे दिसले. हे वासरू जीव वाचवण्याची धडपड करत होते.  सानिका लाड आणि कृष्णा लाड यांनी त्या वासराला टाकीच्या बाहेर काढले आणि आपल्या घरी आणून त्याला खायला दिले. सुदैवाने वासराला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नव्हती. 

त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील काही लोकांना फोन करून अशा प्रकारचे वासरू कोणाचे आहे का, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कोणाचे वासरू आहे समजू शकले नाही. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून  वासरू कोणाचे असेल तर त्यांनी लाड कुटुंबीयांशी संपर्क साधावा, असा संदेश देण्यात आला. त्यानंतर ते वासरू दळे शिवगण वाडीतील असल्याचे समजले. त्या शेतकऱ्याने सकाळी त्या वासराला ताब्यात घेतले.

लाड कुटुंबीयांच्या तत्परतेमुळे एका मुक्या जीवाचा प्राण वाचल्याबद्दल कौतुक होत आहे . शेतीचे दिवस सुरू असतानाही काही जण आपल्या पाळीव जनावरांना मोकाट सोडत असल्याने अशा घटना होत असतात. त्यामुळे मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांनी याचा विचार करावा, असे ग्रामस्थांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments