ठाकरेंच्या शिवसेनेला हादरे, कोकणात जिंकले राणे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड ठाकरेंच्या शिवसेनेने गमावला
विनायक राऊत, अनंत गीते पराभूत
रत्नागिरी - देशपातळीवर आणि महाराष्ट्रात एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले तरी कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकले. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला साथ देणाऱ्या कोकणच्या जनतेने विनायक राऊत आणि अनंत गीते यांना घरी बसवल्याने हा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिंरजीव निलेश राणे निवडणुकीसाठी उभे राहिले होते, मात्र दोन्ही वेळेला कोकणच्या जनतेने त्यांना नाकारले होते. दोन्ही वेळेला त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र या वेळी भाजपाच्या नारायण राणे यांनाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि त्यांना जिंकून आणले. नारायण राणे यांनी लोकसभा निवडणूक जिंकत मुलाच्या पराभवाची परतफेड केल्याची चर्चा रंगली आहे. तसेच नारायण राणेंच्या विजयात शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा वाटा असल्याचीही चर्चा कोकणात सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणात दीर्घ काळानंतर भाजपाला यश आपला उमेदवार जिंकून देण्यात यश आले आहे.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा ४८ हजार मतांनी पराभव केला. २५ फेऱ्यापैकी तिसऱ्या फेरीतच नारायण राणे यांनी आघाडी घेतली. प्रत्येक फेरीत नारायण राणे यांचे मताधिक्य वाढत गेले आणि त्यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला.
रत्नागिरीपाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेला रायगडमध्येही मोठा धक्का बसला आहे. रायगडचा गड हा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी राखला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पुन्हा एकदा विजयी झाले. त्यांनी अनंत गीते यांचा ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मते मिळाली आहेत तर अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ६६८ मते मिळाली. या निवडणुकीत सुनील तटकरे यांचे मताधिक्य वाढले. सुनील तटकरे यांना ५०.१७ टक्के मते तर अनंत गीते यांच्या पारड्यात ४३ टक्के मते पडली.
0 Comments