Header Ads Widget

Dombivli MIDC Blast: डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू


Dombivli MIDC Blast: डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू 

४८ जखमी, मृतांची संख्या वाढण्याची भीती


Dombivli MIDC Blast Latest Updates: डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत आज दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा भला मोठा स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले. या घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ४८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत होते. नागरिकांनाही या घटनेचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्याची माहिती घेतली आणि पुढील निर्देश दिले.

काय घडली घटना?

डोंबिवलीत्या एमआयडीसी फेज दोन मध्ये अंबर केमिकल कंपनीत दुपारी २ ते २.३० च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटर परिसरात जाणवले. यामुळे इमारतींच्या काचाही फुटल्या तसंच काही कार्संचंही नुकसान झालं आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. आता या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तीन मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. एक्स पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

भीषण स्फोटानंतर एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या एका कामगाराने सांगितलं की, स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती. इतका मोठा स्फोट होता की, आम्ही सगळे बाहेर पडलो. सगळे आगीचे लोळ येत होते. आमच्या हाताला भाजले आहे, असं कामगाराने एका चॅनलला सांगितलं. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोठे स्फोट झाले, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

श्रीकांत शिंदे यांनी काय म्हटलं आहे?

बॉयलरचा स्फोट झाला आहे. त्यामुळे कंपनीत आग लागली आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. जखमींना आम्ही विविध रुग्णालयात दाखल केलं आहे. ४८ जण या घटनेत जखमी झाली आहे. अतिधोकादायक रसायनं तयार करणाऱ्या कंपन्या शहराच्या बाहेर नेल्या जाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे. आम्ही यासंदर्भात पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आम्ही चर्चा करुन याविषयीचा निर्णय घेऊ. येत्या सहा महिन्यांत इथल्या अतिधोकादायक केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या शहराबाहेर कशा नेता येतील यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे.

मनाचा_चटका_लावणारी घटना



आज झालेल्या डोंबिवली MIDC स्फोटामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावची शांत आणि प्रेमळ कन्या रोहिणी चंद्रकांत कदम हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहिणी ही फक्त 25 वर्षाची होती. ऐन तारुण्यात सगळ्यातून निघून जाण ही अत्यंत दुःखद बाब आहे. तिच्या जाण्याने कुटुंबात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. या घटनेने कदम कुटुंबावर दुःखाच डोंगर कोसळला आहे .

source -www.loksatta.com


Post a Comment

0 Comments