सन्मान माहेरवाशिणींचा, उपक्रम जावडे झिमणवाडीचा
- प्रमोद तरळ
लांजा - तालुक्यातील मौजे जावडे येथील उत्कर्ष मित्र मंडळ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील ५० वर्षांतील सुमारे ६० माहेरवाशिणींना मोठ्या जिव्हाळाने माहेरची साडी देऊन सन्मान करण्यात आला. मंगळवारी १४ मे रोजी जावडे येथे तालुक्यात प्रथमच राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे तालुक्याभरातून कौतुक होत आहे.
तालुक्यातील जावडे झिमणवाडी येथे मध्यवर्ती भागात हा आगळा वेगळा कौटुंबिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. खरे तर एकदा विवाह झाला की ती महिला आपल्या सासरी जाते आणि ती आपल्या संसारात व्यस्त होते. मात्र कधी सुख, दुःख किंवा सण असो किंवा शुभ कार्यात ती आपल्या माहेरी येत असते मात्र तिचे नाते त्या दिवसापुरतेच मर्यादित राहते. मात्र जावडे झिमणवाडी येथून विवाह होऊन बाहेर गावी गेलेल्या आपल्या माहेरवाशिणींशी संपर्क साधून त्यांना अगत्याचे नियंत्रण देतानाच त्यांना प्रेमाची आपुलकीची माहेरची साडी देत त्यांचा गौरव तर केलाच पण त्यांच्या सोबत त्यांच्यासाठी स्पर्धात्मक कार्यक्रम राबिवले आणि विजेत्यांना भेटवस्तू देऊन गौरव केला. त्याचबरोबर सर्वच शालेय विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी त्या वयोवृद्ध महिलांच्या डोळ्यात नकळत आनंद अश्रू तरळले आणि हा वाडवडिलांचा वारसा आणि हे नातं असेच पुढे जोपासताना आजच्या युवा पिढीने भविष्यात यशवंत आणि कीर्तिवंत होण्याचा आशीर्वाददेखील दिला .
या सन्मान सोहळ्यादरम्यान शिक्षणाचे तसेच संस्कृतीचे महत्त्व सांगणाऱ्या आशयाचा संदेश देतानाच या महिलांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला. माहेरवाशिणीमधील काही स्त्रियांनी मनोगत व्यक्त करताना समाधान व्यक्त केले. तसेच या उपक्रमातून दोन गावे जोडताना दोन मनेदेखील जोडली जात आहेत आणि असेच उपक्रम झाले तर नाती अधिक वृंद्धीगत होतील, असा विश्वास व्यक्त केला. जावडे झिमणवाडी येथील उत्कर्ष मित्रमंडळाच्या या उपक्रमाचे तालुक्याभरातून कौतुक केले जात आहे. सदर उपक्रमाचे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाचे अध्यक्ष संतोष माटल यांनी कौतुक करत या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ताराम झिमण, सागर नामये, सचिन झिमण, राजेश बाने यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments