संगमेश्वरातील असुर्डेत टँकरने पाणीपुरवठा
सरपंच, ग्रामस्थांनी मानले पंचायत समितीचे आभार
- प्रमोद तरळ
संगमेश्वर - तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत मौजे असुर्डे तालुका संगमेश्वर येथील प्रभाग क्रमांक-२ मनवेवाडी, गुरववाडी, पाताडेवाडी, कुल्येवाडी/ लोहारवाडी येथे गेल्या महिनाभर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. गावात असलेली पाणी व्यवस्था कोलमडून पडली आहे. मुख्य बंधाऱ्यातील पाणीपातळी संपूर्ण सुकलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच प्रदीप शिंदे आणि त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य अशोक तांबे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर मुंडेकर, प्रदीप मोहीते यांच्याबरोबर श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मुंबई मंडळाचे प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्न सुरु केले. संबंधित विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले आणि त्यांच्या सूचनेनुसार लागणारे ठराव सरपंच, तलाटी, पोलीस पाटील, यांच्या बरोबरीने पंचनामा करून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन तातडीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून १३ ते १७ मे २०२४ पर्यंत गावात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. आतापर्यंत तीन टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून यापुढेही ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावामध्ये पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन पंचायत समिती बीडीओ यांनी सरपंचांना दिले.
ग्रामस्थांची गैरसोय तातडीने दूर केल्याबाबत पंचायत समितीच्या सर्व अधिकारी वर्गाचे ग्रामपंचायत सरपंच व सर्व ग्रामस्थ तसेच श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने आभार मानण्यात आले.
0 Comments