पाण्याची वाट अडली, तळीवाडीला नडली
आडिवरे - यंदाचा पावसाळा तळीवाडीला आठवणीत राहणार आहे. तळीवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच कातळावरील पाणी गावात शिरले होते. हे पाणी कुणाच्या घरात शिरले तर कुणाच्या गोठ्यात शिरले होते. त्यामुळे गावात एवढे पाणी शिरले कसे, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती.
आडिवरे परिसरातील कातळांची विक्री होत आहे. त्यामुळे कातळावर आंबा - काजूच्या बागा तयार होत आहेत. पाण्याचे पारंपरिक मार्ग अडवले जात आहेत, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
तळीवाडीच्या कातळ परिसरात पारंपरिक पाण्याचा मार्ग अडवला गेल्याने सर्व पाणी गावात शिरले. पाण्याला वाटच न मिळाल्याने जेथे वाट मिळेल तेथे पाणी शिरले. भरपावसात ही घटना घडल्याने पाण्यालाही जोर होता. त्यामुळे शिवारातून हे पाणी थेट वाडीत शिरले. वाडीत असलेला व्हालही ओसंडून वाहत होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पाण्याचा जोर इतका होता की, रस्त्याच्या आजूबाजूला असलेली माती, दगड, लाकूड पाण्याच्या प्रवाहाबरोबर रस्त्यावर आले. वाट मिळेल तिकडे पाणी शिरल्याने ते कुणाच्या घरात तर कुणाच्या गोठ्यात शिरले. गावातील अनेकांच्या घराभोवती दगडी कुंपण असल्याने त्यांच्या घरात पाणी शिरले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शेवटी रस्त्यावर साचलेला दगड, मातीचा गाळ काढण्यासाठी तळीकरांना रस्त्यावर उतरावे लागले. तळीकरांनी पुन्हा एकदा एकजूट दाखवत रस्ता साफ केला.रस्त्यावर साचलेला गाळ काढण्यासाठी तळीकरांचे हात पुढे सरसावले. त्यांच्या एकीपुढे आणि हातांपुढे जेसीबीही फिके ठरले, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
0 Comments