...आणि दहावीच्या आठवणी जागा झाल्या
कडवई भाईशा घोसाळकर हायस्कूल
१९९३च्या दहावी बॅचचे विद्यार्थी रमले आठवणीत
रत्नागिरी - कडवई भाईशा घोसाळकर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या सन १९९२-९३ च्या दहावी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित शिक्षकवृंदाचे औक्षण करण्यात आले. मार्गदर्शन करणारे सुधेन्द्र आंबेगावकर, नंदकुमार धनावडे,पांडुरंग जाधव आणि सुभाष ब्रीद आदी शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना नंदकुमार धनावडे म्हणाले की, विद्यार्थ्यांला परफेक्ट बनवणे हे शिक्षकांचे कामच आहे आणि हे काम करण्यात आम्ही यशस्वी झालो, हे आजच्या मेळाव्यावरून समजले. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून धन्य वाटले, असे ते पुढे म्हणाले. सुधेन्द्र आंबेगावकर म्हणाले की, आज माझे विद्यार्थी अनेक क्षेत्रांत चमकत आहेत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून आठवणींना उजाळा दिला. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेला खेळाचे साहित्य आणि वेट लिफ्टिंगच्या २ जोडी प्लेट भेट दिल्या. भविष्यात भरीव मदतीची ग्वाही दिली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, पर्यवेक्षक संतोष साळुंके, संस्था समन्वय समिती सदस्य वसंत कांबळे, सहाय्यक शिक्षक मिलिंद कडवईकर, शिक्षकेतर कर्मचारी संजय घोसाळकर, अरविंद सुर्वे आणि प्रशांत साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व शिक्षक आणि मान्यवरांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मिरगल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
0 Comments