Header Ads Widget

रोजगाराबाबत केंद्र सरकार उदासीन- मुझम्मील काझी


तरुणांना रोजगार केव्हा मिळणार? - काझी

 - संदीप शेमणकर

रत्नागिरी - कोकणातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना केंद्र सरकार उदासीन आहे,असे गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते मुझम्मील काझी यांनी म्हटले आहे. ग्रामविकास मंडळ शिगवणवाडी परचुरी येथे नुकताच वार्षिक स्नेह संमेलन सोहळा उत्साहात पार पडला झाला. यावेळी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते मुझम्मील काझी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

मुझम्मील काझी यांनी पुढे मार्गदर्शन करताना सांगितले की, गेली दहा वर्षे रिफायनरीच्या नावाखाली कोकणाला फक्त गाजर दाखवले गेले. जर केंद्र सरकारला इथल्या स्थानिकांना रोजगारच द्यायचा असेल तर पर्यावरणपूरक असे उद्योग धंदे तसेच प्रकल्प आणले पाहिजेत. कोकण बोर्डाची मुले १० वी १२ वीच्या परीक्षेत प्रथम येतात, मात्र त्यांच्या शिक्षणानुसार योग्य तो रोजगार कोकणात उपलब्ध नाही. त्यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहे. गावेच्या गावे ओस पडत चालली आहेत. शेती संपत चालली आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांना याचा जाब विचारणार आहोत की नाही? पुढे काझी यांनी म्हटले की, कुठे आहेत नेते जे कोकणचा कॅलिफोर्निया करणार होते? आम्हाला कोकणचा कॅलिफोर्निया नको तर कोकणचे कोकणपण टिकवून उद्योग उभारले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

गाव विकास समितीची भूमिका स्पष्ट करताना मुझम्मील काझी यांनी सांगितले की, कोकणात मागील काही वर्षात दोन दोन उद्योग मंत्री असतानाही कोकणच्या हिताचे प्रकल्प या ठिकाणी येऊ शकले नाहीत. उद्योगमंत्री असताना विकास होऊ शकत नाही ही दुर्दैवी बाब आहे. परिणामी दहा वर्षे सत्तेत असणाऱ्या केंद्र सरकारचे धोरण कोकण हिताचे नाही. कोकण हा प्रचंड निसर्गसौंदर्य लाभलेला भाग आहे. मात्र या कोकणचा विकास करण्याचे धोरण राबवण्याचा दृष्टिकोन मागील दहा वर्षात दिसला नाही. यावेळी आपण मतदान करताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कोकण हितासाठी मतदान केले पाहिजे. जे कोकणाच्या हिताचे धोरण राबवू शकतील अशांच्या मागे उभे राहा. दहा वर्ष सत्ता असतानाही कोकणाकडे दुर्लक्ष केलं असेल तर याचा जाब कोकणातील जनतेने विचारला पाहिजे!

यावेळी मंचावर परचुरी गावच्या सरपंच शर्वरी वेल्ये, उपसरपंच प्रदीप चंदरकर, पंचायत समिती उपसभापती परशुराम वेल्ये, डॉ. विनायक पेठे, अनंत शिंदे, डॉ.चंद्रकांत लिंगायत, सुहास घाणेकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष माटल, उक्षी गावचे उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, रमेश मेस्त्री, विनायक शिगवण, गावप्रमुख भिकाजी कळंबटे तसेच मंडळाचे वाडीप्रमुख अर्जुन शिगवण, कार्यवाह यशवंत शिगवण, अध्यक्ष मधुकर शिगवण, उपाध्यक्ष मंगेश शिगवण आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments