मोफत औषधवाटप, एक समाजसेवा
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत फिनोलेक्स इंडस्ट्रीज
आणि मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार
रत्नागिरी - राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यामार्फत क्षयरुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, जलसंधारण आणि स्वच्छता यांसारख्या विविध क्षेत्रात काम करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमानुसार फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये आजपर्यंत ११०० गरीब व गरजू क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार देऊन निक्षय मित्र' बनून आरोग्य क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे तसेच लवकरच राजस्थानमध्येही येणाऱ्या काळात टीबी पेशंटला मदत सुरु करण्यात येणार आहे, अशीही माहिती देण्यात आली.
त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी व पुणे जिल्ह्यातील क्षयरुग्णांसाठी निक्षय मित्र अंतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांसाठी एक पाऊल पुढे टाकत आणि रत्नागिरी व पुणे येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या तात्काळ आवाहनाला प्रतिसाद देत फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशने ९४८ टीबी रुग्णांना अँटी-कोच औषधे दिली आहेत.
राज्यामध्ये क्षयरोगाच्या औषधांचा कमी पुरवठा होत असल्याने क्षयरुग्णांना नियमित औषधोपचार मिळण्यासाठी फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाऊंडेशन यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांना १ महिना पुरेल एवढा औषधसाठा पुरविण्यात आला आहे. त्याची सुरुवात ३ मे २०२४ पासून करण्यात आली.
सदर कार्यक्रमा वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधिकारी डॉ. विटेकर, मा. टेक्निकल डायरेक्टर फिनोलेक्स सोमय्या चक्रवर्ती, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, वैद्यकीय अधिकारी फिनोलेक्स डॉ.अनुप करमरकर तसेच जनसंपर्क अधिकारी अभिषेक साळवी आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
डॉ. जगताप, डॉ. आठल्ये आणि डॉ. गावडे यांनी या देणगीबद्दल फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या रितू प्रकाश छाब्रिया यांचे विशेष आभार मानले.
0 Comments