तहसीलदार श्रीकांत पाटलांवरील हल्ल्यामागे कोण?
वाळूमाफियांविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका हे कारण
- संदीप शेमणकर
इंदापूर - इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयाकडे जाताना अज्ञात हल्लेखोरांनी गाडी आडवी घालून चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लाकडी दांडकी, लोखंडी रोडच्या साह्याने काचा फोडल्या व जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्याचा प्रमुखच जर सुरक्षित नसेल, तर काय करायचे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. इंदापूरच्या पोलिसांनी अवघ्या काही वेळातच पाच जणांना पकडले. यामध्ये शिवाजी किसन एकाड, पिण्या ऊर्फ प्रदीप बागल, विकास नवनाथ देवकर, तेजस अनिल वीर व माऊली ऊर्फ शुभम भोसेकर आशिया पाच आरोपींची नावे आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी ही माहिती दिली.
श्रीकांत पाटील हे काही इंदापूर तालुक्यात नवीन तहसीलदार नाहीत. यापूर्वीदेखील त्यांनी या तालुक्याचा कारभार पाहिलेला आहे. सामान्यांच्या प्रश्नासाठी सामोपचाराने मार्ग काढणारा तहसीलदार आणि चुकीचं कृत्य करणाऱ्यांना वठणीवर आणणारा तहसीलदार अशी त्यांची तालुक्यात एक प्रतिमा तयार झाली आहे.
त्यांनी वाळूमाफियांसंदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका हेच या हल्ल्यामागचे प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे. भरल्या नदीत उडी मारून वाळूमाफियांची गठडी वळणारे तहसीलदार म्हणूनही श्रीकांत पाटलांची ओळख तयार झाली, त्यामुळे वाळूमाफियांवर त्यांचा वचक बसला होता.
अचानक श्रीकांत पाटलांची बदली झाली त्यानंतर मधल्या पुन्हा वाळूमाफियांचा हैदोस वाढला. वाळूमाफियांच्या संरक्षणासाठी अगदी पोलीस कोठडीत जाऊन बसण्यापर्यंत एका महिला अधिकाऱ्याची मजल गेली आणि तिथेच इंदापूरच्या या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले, अशी चर्चा सुरू आहे.
या एका महिला अधिकाऱ्याच्या भयाण परिस्थितीमुळे पुन्हा एकदा वाळूमाफियांचे फावले. त्यांनी पुन्हा गावात दहशत निर्माण केली. मात्र तहसीलदार म्हणून श्रीकांत पाटील आल्यानंतर त्यांना आपलं साम्राज्य खालसा होत आहे याची जाणीव होऊ लागली. वाळूचा अफाट पैसा बंद झाला, या चिंतेने या वाळूमाफियांची झोप उडाली आहे. त्यांच्या मागे फिरणाऱ्या चमच्यांचं पोट कसं भरायचे आणि मग आपली दहशत कशी ठेवणार? असा प्रश्न या वाळूमाफियांना पडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
0 Comments