जैतापूरच्या सुजाता वाडकर यांची मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड
- संदीप शेमणकर
राजापूर - जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास ध्येयापर्यंत सहज पोचता येते याचे उदाहरण राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील सुजाता समीर वाडकर यांनी घालून दिले आहे. गृहिणी म्हणून संसार सांभाळतानाच त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश संपादन केले आहे. त्यांची मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे.
राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील समीर बाळू वाडकर हे रत्नागिरी पोलीस दलात सेवेत असून त्यांच्या पत्नी सुजाता यादेखील आता शासकीय सेवेत रुजू होणार आहेत. सुजाता समीर वाडकर यांचे बीएसस्सीपर्यंत शिक्षण झाले असून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. अनेकदा विवाहानंतर मुलींना संसारामुळे आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते, मात्र सुजाता यांचे पती समीर वाडकर यांनी त्यांना भक्कम साथ दिली. संसार सांभाळतानाच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला.
अभ्यासाला मार्गदर्शनाची जोड मिळावी याकरीता सुजाता यांनी सांगली, इस्लामपूर येथील ॲकॅडमीत वर्षभर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन घेतले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले आणि दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आले. २०२२ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांची मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे. या यशात पती समीर वाडकर यांचा मोलाचा वाटा असल्याचे सुजाता समीर वाडकर यांनी सांगितले.
0 Comments