पुस्तकांशी आजन्म मैत्री करा - बी. के. गोंडाळ
राजापूर - पुस्तके ही आपल्या मानवी जीवनासाठी सखे, सोबती आणि जीवनसांगाती असतात म्हणून पुस्तकांशी आजन्म मैत्री करा,आपल्या शालेय अभ्यास क्रमातील पुस्तके आपल्याला जीवनदिशा देतील तर शाळाबाह्य अवांतर पुस्तके जीवन कसे जगावे हे शिकवतील, असा विचार राजापूर तालुक्यातील जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी मांडला
मालवण येथील बँ.नाथ पै सेवांगण येथे वय वर्षे १० ते २० वर्षे वयोगटातील मुलांचे राष्ट्र सेवा दलाचे, पाच दिवसाचे साने गुरुजी संस्कार शिबीर घेण्यात आले होते. त्या शिबिरात 'माझे वाचनवेड' या विषयावर बी. के. गोंडाळ बोलत होते.
विध्यार्थ्यांनी दररोज किमान एक पेपर वाचवा. आपल्या नजीकच्या वाचनालयाचे सभासद व्हावे. पंधरा दिवसातून किमान एक चांगले पुस्तक वाचावे. वाचलेल्या पुस्तकातील चांगल्या बाबींच्या नोंदी कराव्यात. वृत्तपत्रातील चांगल्या बातमीचा संग्रह करावा. आपल्या घरात शालेय पुस्तकंबरोबरच अवांतर पुस्तकांचे कपाट असावे. इतर वस्तूंबरोबर महिन्यातून किमान एक पुस्तक विकत घ्यावे. या साऱ्या कृतीतून आपल्यामध्ये वाचनाची सवय लागेल वाचनवेड निर्माण होईल, असे गोंडाळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय प्रशिक्षक बाबासाहेब नदाफ, चंदन माटुंगे, सागर पाटील, राज कांबळे, स्नेहल आचरेकर, श्रावणी कुडाळी, मैत्रेयी चव्हाण, राखी मयेकर आदी प्रशिक्षक उपस्थित होते.
0 Comments