SOURCE - WWW.LOKSATTA.COM |
श्री विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या मूर्ती : अभ्यासकांना मिळणार नवी दिशा
पंढरपूर : तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संवर्धनाचे काम सुरू असून रात्री दोनच्या सुमारास हनुमान दरवाज्याच्या बाजूला दगड खचल्याचे दिसून आले. या दगडाचे काम करताना आत खालील बाजूला पोकळी दिसली. तेथे तळघर असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जाहिरात |
श्री विठ्ठल मंदिरात एक तळघर आढळून आले. मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू आहे. फरशीचे काम करत असताना एक पोकळी दिसून आली. साधारणपणे पाच ते सहा फूट खोल एक खोली आहे. पुरातत्त्व विभागाने मंदिरात आढळलेल्या तळघराची पाहणी केली. यामध्ये विष्णूच्या दोन, तर महिषासुरमर्दिनी, तसेच पादुका आणि दोन छोट्या मूर्ती आढळून आल्या आहेत. तसेच काही जुनी नाणीदेखील आढळली. या मूर्ती साधारणपणे सोळाव्या शतकातील असतील, असे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. मात्र, याबाबत संशोधन केल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. हे तळघर पाच फूट बाय पाच फुटांचे असून, उंची सहा फूट आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे यादवकालीन पुरातन मंदिर असल्याची माहिती अनेक संतांच्या अभंगातून ग्रंथातून मिळते. त्यामध्ये कुठे विठ्ठल मंदिरात तळघर असल्याचा संदर्भ आहे का? ते पाहावे लागेल असे पुरातत्त्व विभागाचे विलास वाहने म्हणाले.
0 Comments