बिल्डरच्या मुलाने तरुण-तरुणीला उडवलं, नागरिकांनी मुलाला चोपलं
पुण्यात भरधाव स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू
नागरिकांनी बिल्डरच्या मुलाला दिला चोप
पुणे - पुण्यातील उच्चभ्रू कल्याणीनगर परिसरात स्पोर्ट्स कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक तरुण आणि तरुणी समावेश आहे. अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया अशी त्यांची ओळख पटली असून दोघं राजस्थानचे राहणारे होते.
अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी कारचालकाला चांगला चोप दिला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटकही केली होती, मात्र 24 तासांत त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या मुलाच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका आलिशान कारने रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. मिळालेल्या माहितीनुसार, चालक पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला. कार वेगात होती असा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे. अल्पवयीन चालक पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. प्राथमिक माहितीनुसार, कार चालवत असताना त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्याने अनेक गाड्यांना धडक दिली. याच धडकेत अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया यांना जीव गमवावा लागला आहे. पीडितांचा मित्र एकीब रमझान मुल्ला याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि गाडी ताब्यात घेतली. वेदांत अग्रवाल पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला असं सांगण्यात येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
0 Comments