जरा कोकणवासीयांचा विचार करा
![]() |
'राजापूर - नालासोपारा एसटी विरारपर्यंत सुरू करा'
'एसटी तोट्यात नाही, तर फायद्यातच चालेल'
मुंबई - कोकण रेल्वे सुरू असली तरी त्याचा सर्वच गावांना फायदा होत नाही. अनेकदा रेल्वेस्थानकांवर उतरून त्या त्या एसटी डेपो आणि नंतर त्या त्या गावाला जाणारी एसटी पकडावी लागते. कधी कधी उशीर झाला तर प्रवाशांना रात्र रेल्वेस्थानकावरच काढावी लागते. इतकेच नव्हे तर खासगी बसवाल्यांनी तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा केल्याने कोकणातील प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
जाहिरात - पैशांची गरज आहे ? वाट कसली पाहता ?
सणांच्या दिवसात कोकणवासीय मोठ्या प्रमाणावर गावाला जात असतो. खासगी बस, एसटी, रेल्वे इत्यादी सेवांचा वापर करून गाव गाठत असतो. मात्र त्यासाठी शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यातच बच्चेकंपनी असेल तर हालाला पारावारच उरत नाही. विरारामध्ये मोठ्या प्रमाणावर कोकणातील लोक राहतात. यात राजापूर तालुक्यातील ग्रामस्थांची संख्या खूप आहे. रत्नागिरी, हर्चे, लांजा, राजापूर, आडिवरे, कशेळी, गावखडी, राजवाडी, देवाचे गोठणे, रुंढे- तळी कोंडसर बुद्रुक, कोंडसर खुर्द, नवेदर, मोगरे, पाणेरे भराडे, कांगापूर, तिवरे, गाऊडवाडी, धाऊलवल्ली, भालावली या गावांमधील ग्रामस्थ विरारमध्ये राहतात. ही एसटी सेवा आडिवरे भराडे कांगापूर राजवाडी मार्गे मोगरे धारतळे राजापूर अशी सुरु करावी, अशी मागणी मोगरे राजवाडी पंचक्रोशीने केली आहे.
आवर्जून पाहा - पुन्हा येशील का ?
सध्या राजापूर- नालासोपार ही नालासोपारा आगारापर्यंत आहे. त्यामुळे एसटीने आल्यास नालासोपारा येथे उतरून पुन्हा रिक्षा किंवा एखादं खासगी वाहन पकडून विरार गाठावे लागते. यात शारीरिक त्रास तर सहन करावा लागतोच. मात्र आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो.
रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गातून येणार्या खासगी बस यांचे भाडे जास्त असते. मात्र एसटीची सेवा विरारपर्यंत नसल्याने विरारमध्ये राहणाऱ्या कोकणवासीयांना नाईलाजस्तव खासगी गाड्यांचा पर्याय स्वीकारावा लागतो.
त्यामुळे राजापूर डेपोतून सुटणार राजापूर - नालासोपारा ही एसटी सेवा विरारमधील मनवेल पाड्यापर्यंत सुरू करण्यात यावी, अशी मागणी कोकणवासीयांकडून जोर धरू लागली आहे. विरारपर्यंत एसटी सेवेचा विस्तार केल्यास त्याचा एसटी महामंडळाला मोठा फायदा होईल, असे कोकणवासीयांचे म्हणणे आहे. त्यातच राजापूर - नालासोपारा ही एसटी सेवा विरारपर्यंत विस्तारीत करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. राजापूर आगारातून सुरू केलेली एसटी बस सेवा नालासोपारा आगारपर्यं आहे. ती सेवा विरारपर्यंत करण्यात यावी, यासाठी अनेक ग्रामीण आणि मुंबई मंडळांनी पुढाकार घेतला आहे.

0 Comments