अविनाश लाड यांना विजयाचा विश्वास; शिट्टी चिन्हावर लढणार निवडणूक
अविनाश लाडांचा ललकार, विधानसभा निवडणूक जिंकणार
संदीप शेमणकर
राजापूर - राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसला जागा न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंड करत अपक्ष लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. अविनाश लाड हे शिट्टी या चिन्हावर ही निवडणूक लढवणार असून विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
'गेली १० वर्षे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राजापूर - लांजा तालुक्यांत काम केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत थोड्याच मतांनी पराभूत झालो असलो तरी मतदारसंघात स्थानिक भूमिपुत्रांसाठी केलेली कामे ही जनतेच्या समोर आहेत,' असे अविनाश लाड यांनी सांगितले. तसेच गेली १५ वर्षे विद्यमान आमदाराने काय केले, असा प्रश्न जनताच विचारत असल्याचे अविनाश लाड यांनी सांगितले. त्यामुळे राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघात विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राजापूर आणि लांजा एसटी स्टॅण्डचा प्रश्न प्रलंबित आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न, मुंबई - गोवा महामार्गाचा प्रश्न, बेरोजगारी हटविण्यात आलेले अपयश,आरोग्य सुविधांची कमतरता यांसारखे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीतस, असेही अविनाश लाड यांनी सांगितले. प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरलेल्यांना या निवडणुकीत जनता घऱी बसवेल असा टोलाही राजन साळवी यांचे नाव न घेता लाड यांनी लगावला आहे.
शिट्टी हे चिन्ह घराघरात पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले असून किमान दोन वेळा आम्ही प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधू, असेही त्यांनी सांगितले. ही निवडणूक जिंकण्याच्या ईर्षेनेच मैदानात उतरलो असून मतदारराजाच्या मागणीनुसार आणि मी स्थानिक उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विजय आपलाच असल्याचा विश्वासही अविनाश लाड यांनी व्यक्त केला.
0 Comments