लांजा-राजापुरात कुणबी समाजाची चळवळ जागृत राहणार की बोथट होणार?
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ही एक सर्वात जुनी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या १०-१५ वर्षांपासून समाजाची उन्नती व्हावी म्हणून विविध प्रबोधनाचे कार्यमक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, कुणबी समाजाचा इतिहास आणि विविध सांस्कृतिक वारसा सांगण्याचे मोठे कार्य कोकणात होत आहेत. ही एक पुनर्जिवीत झालेली चळवळच म्हणता येईल. कारण याआधी या चळवळींना विविध माध्यमे दखल घेत नसल्यामुळे संपायची, परंतु अलीकडच्या काळात कुणबी समाजोन्नती संघ मुंबईने कोकणातील तरुणांमध्ये स्वाभिमानाची जाणीव व्हावी यासाठी प्रसंगी प्रचंड मेहनत केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण कोकणात कुणबी समाजाची दखल घेतली जाते. परंतु ही चळवळ राजकीय दूषित वातावरणामुळे खराब होईल का? गद्दारकीच्या खराब राजकारणामुळे त्याचा समाजावर परिमाण होईल का, याची चिंता सर्वसामान्य कुणबी समाजाला होऊ लागली आहे. कारण आजपर्यंत कुणबी समाजातील पुढाऱ्यांमध्ये केवळ आणि केवळ पक्षांतील अमिषांना बळी पडूनच मोठे नुकसान झालेले आहे. त्यांचे रुपांतर मग वैरामध्ये झालेले आपणास पाहायला मिळते.
दिवाळीपूर्वीची खास गिफ्ट आजच खरेदी करा. तिही घरबसल्या
परंतु अलीकडच्या काळात कुणबी समाजाने आपली चांगली पकड धरली आहे. समाजातील अनेक तरुण आता सोशल मीडियावर बोलू लागले आहेत. आपण आतापर्यंत कसे गुलाम राहिलो, कसे पुढाऱ्यांचे झेंडे पकडले, यांची सविस्तर चर्चा करु लागले आहेत. सध्या निवडणुकीचे वारे कोकणात वाहू लागले आहेत. या निवडणुकीत कुणबी फॅक्टरची चर्चा असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या नजरा या समाजातील वाढीस लागणाऱ्या सांघिकतेवर पडली आहे. हा समाज एकत्र होत आहे. त्यामुळे अनेक पक्ष समाज संघटनातील पदाधिकाऱ्यांना पैशांची अमिषे देत आहेत. (म्हणजे तुझं काय ते बोल, तुझी किती माणसं.) त्यामुळे या राजकारणातील पुढाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या ऑफर्समुळे ही समाज चळवळ अडचणीत येईल का, असा अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे. त्यांना पूर्वीचे समाज विकणारे असायचे तसेच सध्याचे नाहीत ना, अशी शंका वाटू लागली आहे. परंतु आताच्या चळवळीत अनेक तरुण असल्यामुळे अशा पैशाने विकत घेणाऱ्यांना हेच तरुण तातडीने उघड करतील आणि त्याची हकालपट्टी करतील याची खात्री आहे.
कोकणात सर्वाधिक लोकसंख्या ही कुणबी समाजाची आहे. परंतु राजकीयदृष्ट्या या समाजातील तरुणांपुढे सध्यासतरी जागृती नसल्यामुळे एखादी निवडणूक जिद्दीने जिंकता येईल, असे कधीच लढत नाहीत. त्यामुळे इतर समाजातील जागृत नागरिक सत्तेची दोरी सहज हातात घेत आहेत आणि त्यांचे गुलाम म्हणून कार्य करण्याचे काम येथील तरुण, गावातील पुढारी करीत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजातील अनेक लोकसेवकांनी सर्वप्रथम कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता सर्वोच्च पद जिद्दीने कसे हस्तगत करता येईल, याकडे जाणूनबजून लक्ष दिले पाहिजे. कारण एखादा सामाजिक प्रश्न निर्माण झाला तर तो विधानसभेत मांडण्यासाठी त्या समाजाचाच आमदार सविस्तरपणे मांडू शकतो आणि त्या समाजावर झालेला अन्याय दूर करु शकतो, हे महत्त्वाचे आहे.
सध्या निवडणुकीमुळे आणि पैशांचे अमिष दाखविल्यामुळे समाज तुटण्याची शक्यता आहे. त्यातच राजकारणात दोन गट पडलेले आहेत.सहजच समाजातील काही समर्थकही त्याच बाजूने जाण्याची शक्यता आहे. परंतु कुणबी समाजाची एक चळवळ आहे ती अबाधित राखंण्याची जबाबदारी जागृत कुणबी युवक आणि समाजसेवकांची आहे. गेल्या ३० वर्षात राजकीय पुढाऱ्यांनी कधी कोकणाचा विकास केला नाही, ते येत्या पाच वर्षांत कसा करतील? "विकास" हा मोठा प्रश्न आहे. ते तुम्हाला २ ते ३ हजार रुपयात विकत घेण्याचे प्रयत्न करतील, परंतु स्वाभिमानी समाजातील युवकांना ते पैसे उमेदवारांच्या तोंडावर मारण्याची तयारी ठेवावी. ते पैसे कधीच आयुष्यभर पुरत नाहीत, परंतु समाजाने समाजासाठी निर्माण केलेली कुणबी चळवळ एकदा का बोथट झाली तर पुन्हा त्याच उभारीने ती जोडणे शक्य नाही. त्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागत असतो. तो पुन्हा होईल याची शाश्वती देता येणार नाही. तेव्हा सावधान. समाजाला कोणासाठी, कुणालाही विकू नका आणि स्वाभिमान जपा. समाजातील आमदार विधानसभेत कसा पाठविता येईल, याकडे पुढील २५ दिवस डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे. मुंबईकर चाकमान्यांनी गौरी-गणपतीला जसे गावी जातात तसे ते आपला स्वाभिमान जपण्यासाठी १०० टक्के मतदान करुन आपला हक्काचा उमेदवार जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
साभार
- सचिन ठिक, मुंबई
0 Comments