dhaulvalli : दुसऱ्याचा फोन नंबर त्याच्या ब्लड ग्रुपसह सेव्ह करा - फाटक
- संदीप शेमणकर
राजापूर - आपण व्हाट्सअॅप वापरतो. आपली फ्रेंडलिस्टही मोठी असते. आपण विविध ग्रुपचे मेंबरही असतो किंवा एखाद्या ग्रुपचे ॲडमीनही असतो. आपण काय करतो, एका व्यक्तीचा फोन नंबर आहे त्याचे फक्त नाव टाईप करून सेव्ह करतो. उदाहरणार्थ माझं नाव 'भरत जाधव' मग तो कुठला धाऊलवल्ली गावचा म्हणजे असे काही तरी टाईप करून नाव सेव्ह करून ठेवतो. त्याऐवजी 'भरत जाधव B+ धाऊलवल्ली' असे नाव टाईप करून ठेवा. B+ हा त्याचा रक्त गट असेल. जेणेकरून एखाद्या वेळेस मित्रमंडळीमध्ये, नातेवाईकांमध्ये कुणा व्यक्तीला तातडीची रक्ताची मदत हवी असेल तर उपलब्ध होऊ शकते, असे फाटक यांनी सांगितले.
कै. सौ. आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय, धाऊलवल्ली या संस्थेचे संस्थापक कै. श्री. रामभाऊ गोखले यांच्या स्मृतिदिनानिमित्त फाटक यांचे 'सायबर गुन्हे' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी फोन नंबर कसा सेव्ह करायचा याचे उत्तम मार्गदर्शन केले.
फाटक यांनी आधुनिक काळात डिजीटल गुन्हे कसे होतात आणि त्यावर कोणकोणते उपाय आहेत, याची माहिती खूप सोप्या पद्धतीने करून दिली. आपण समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत, ही जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
आपला एखादा नातेवाईक, मित्र किंवा कोणी जवळचा आजारी असेल आणि तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे अशा वेळी आपण काय करतो, साधारणपणे त्याला बघण्यासाठी जातो. सोबत फळे, नारळपाणी अशा वस्तू घेऊन जातो. त्याऐवजी आपण त्याला आपल्या परिस्थितीनुसार आर्थिक मदत करावी. अशी परंपरा चालू करावी, असेही फाटक यांनी सांगितले.
0 Comments