thackeray vs fadanvis : ठाकरे कडाडले, भाजपा भडकले
विशेष प्रतिनिधी
पुण्यातील भाजपाच्या अधिवेशनात मैदानात उतरा आणि ठोकून काढा असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला होता, तर मुंबईच्या रंगशारदामध्ये एकतर तू राहशील नाही तर मी राहीन अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला आणखी एका संघर्षाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई - ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरी शैलीत टीका केली. आता एक तर तू राहशील नाही तर मी राहीन अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की पंतप्रधान मोदींना घाम फुटला असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.मुंबईतील रंगशारदा येथील झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी इशारा दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरे आणि भाजपा यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.
'गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे नेते भेटून गेले आहेत. मात्र जोपर्यंत आपण सरळ असतो तेव्हा सरळ असतो, पण वाकड्यात घुसलो तर आपण वाकडे करतो. भाजपा म्हणजे चोर कंपनी आहे आणि राजकारणातील षंढ माणसं आहेत,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत आपण असो लढलो की पंतप्रधान मोदींनाही घाम फुटला. मोदींची भाषणं ऐकताना आता कीव येते. जे जे शक्य झाले ते सर्व काही मी केले. हे आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणारे कुणी राहणार नाही. शिवसेना ही काही गंजलेली तलवार नाही तर ती तळपती तलवार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात सांगितले.
'सर्व सहन करून उभा राहिलो आहे, आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. मी माझ्या शिवसैनिकांना घेऊन लढेन. आताही ज्यांना कुणाला जायचे आहे त्यांनी जावे. जे लोक माझ्यासोबत होते ते आता माझ्या घरावर चालून येत आहेत. आदित्य याला तुरुंगात टाकण्याचे फडणवीसांचे डाव होते हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. हे सर्व सहन करून मी हिमतीने उभा राहिलो आहे. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि पैसा नाही. मात्र मी केवळ तुमच्या ताकदीवर सर्वांना आव्हान देत आहे,' असेही ठाकरे भाषणात म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे आजचे भाषण भाजपाच्या चांगलेच जिव्हारी लागले. भाजपाच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे आसूड ओढले.
फडणवीस - शिंदे पुरेसे आहेत - प्रवीण दरेकर
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज नाही, ठाकरे यांना फडणवीस - शिंदेच पुरेसे आहेत, असे प्रत्युत्तर प्रवीण दरेकर यांनी दिले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना व्यक्तिगत धमकी दिली आहे, मात्र भाजपा अशा धमक्यांना भीक घालत नाही, असे दरेकर यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे आहे, त्यांनी बाळासाहेबांचा वारसा सोडल्याचे दिसून येत असल्याची टीकाही दरेकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे अपप्रवृत्तींचे कर्दनकाळ आहेत आणि ते सर्वात लोकप्रिय नेते आहेत हे अनेकदा सिद्ध झाले आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे ही कर्णाची भाषा बोलत आहेत - सुधीर मुनगंटीवार
लोकशाही निवडणुकीत उद्धव ठाकरे हे कौरवांच्या बाजूने होते आणि ठाकरे कर्णाची भाषा बोलत आहेत, अशी टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. कर्ण हा पांडवांचा भाऊ होता. इतिहासाची पुनरावृत्ती होते. बाळासाहेब ठाकरे कधीच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नव्हते. काँग्रेससोबत ज्या दिवशी जावे लागेल, त्या दिवशी मी माझे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, मात्र दुर्दैवाने जी कर्णाची भूमिका दुर्योधनाच्या आणि कौरवाच्या बाजूने जाण्याची होती,ती भूमिका उद्धव ठाकरे यांनी या लोकशाहीच्या युद्धात घेतली आहे, असा सणसणीत टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे उपकार विसरले - चंद्रशेखर बावनकुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवशावर उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आले होते. मात्र उद्धव ठाकरे उपकार विसरले अशी बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मुंबई आणि नाशिकमधील मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे होते याची आठवणही बावनकुळे यांनी करून दिली. 'आता तर ठाकरे यांनी मी मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांच्या जीवावर फडणवीसांना बघून घेईन, भाजपाला बघून घेईन. उद्धव ठाकरे यांना ही चिथावणीची भाषा शोभत नाही. जातीपातीचं राजकारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले, अशी घणाघाती टीका बावनकुळे यांनी केली आहे.
0 Comments