राजापूर-चिखलगाव मार्गावर नवी मोरी ठरणार अपघातास निमंत्रण ?
ऐन पावसाळयात सुरू असलेल्या कामामुळे ग्रामस्थांची गैरसोय
अधिकारी आणि ठेकेदाराचे साटेलोटे?
राजापूर - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दोन वर्षांपुर्वी निधी मंजूर होऊनही ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेण्यात आलेल्या राजापूर चिखलगाव मार्गावरील मोरीच्या कामामुळे शीळ, गोठणे दोनिवडे चिखलगाव भागातील ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. घाईघाईने हाती घेण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबतही सांशकता व्यक्त होत असून चुकीच्या पद्धतीने ही मोरी बांधण्यात येत आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच भविष्यात ही मोरी अपघातास निमंत्रण ठरण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
राजापूर चिखलगाव हा अर्जुना नदीकिनाऱ्यावरून जाणारा मार्ग आहे. गेल्या अनेक वर्षात नदीपात्रातील गाळ उपसा न झाल्याने नदीपात्र भरले आहे. या मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलानजीक शीळ आणि राजापूरच्या हद्दीवर असणारी सखल मोरी पाण्याखाली जाते, त्यामुळे हा मार्ग पावसाळ्यात बंद होतो. तर ही मोरीही एका बाजूने खचल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या मोरीची दुरुस्ती करताना उंची वाढविण्याची मागणी सातत्याने या परिसरातील ग्रामस्थांतून होत होती. त्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी शासनाकडून सुमारे ५० लाखांचा निधी या कामासाठी मंजूर झाला होता. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाची निविदा व काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र ठेकेदाराच्या मनमानीमुळे हे काम दोन वर्षे रखडले होते. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारले. संबंधित अधिकाऱ्यांच्या सुस्त धोरणामुळे हे काम रखडले होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हे कोणत्या पद्धतीचे इंजिनिअरिंग?
आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या मोरीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यावेळी ग्रामस्थांनी चुकीच्या पद्धतीने हे काम सुरू असल्याचे निदर्शनास आणूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम रेटून नेत सुरू केले. वास्तविक या रस्त्याला नव्याने करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीला समांतर ही मोरी घालणे आवश्यक असताना धोकादायक पद्धतीने ही मोरी घालण्यात आली आहे. तर या मार्गाचे उंचीकरण प्रस्तावित असताना नदीपात्राला सखल भागात ही मोरी घालण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे कोणत्या पद्धतीचे इंजिनिअरिंग आहे, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
सध्यस्थितीत पावसामुळे काम सुरू असतानाच मोरी खचली असून मोठी दलदल निर्माण झाली आहे. या कामामुळे या मार्गावरील एसटी वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. जर उंची न वाढविता ही मोरी घालण्यात आली असेल तर भविष्यात रस्त्या उंच कसा करणार, हा प्रश्न ग्रामस्थांतून विचारण्यात येत आहे. मुळात मोरी ही अवघड आणि धोकादायक वळणावर असताना हे वळण कमी करून अपघाताचा धोका कमी करण्याऐवजी त्रिकोणी वळण करून अपघातास निमंत्रण देणारी ठरली आहे. त्यामुळे शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा उपयोग ठेकेदाराच्या फायद्यासाठी की समस्या सोडविण्यासाठी असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
बांधकाम विभागाचे अधिकारी बघ्याच्या भूमिकेत
गेले दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजापूर चिखलगाव रस्त्याच्या एकूणच दुरवस्थेबाबत बघ्याची भूमिका घेत असल्याचे सातत्याने पुढे आले आहे. राजापूर चिखलगाव हा रस्ता नदीकिनारी असल्याने या रस्त्याची उंची वाढवावी अशी सातत्याने मागणी होत आहे. मात्र सुरुवातीच्या ० ते ४ किमी टप्प्यातील कामाला निधी न आणता या मार्गावरील ४ ते ८ किमीच्या टप्प्यातील काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. त्यामुळे या मार्गाचा प्रश्न जैसे थे राहिला आहे. त्याचबरोबर सध्या काम सुरू असलेल्या मोरीच्या नजीकच्या भागातून सर्वाधिक उंचीचा पुल होत असताना या रस्त्याची दुर्दशा झाली असताना केवळ अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने येथील संरक्षण भिंत व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तसेच राहिले. स्थानिक आमदार राजन साळवी यांनीही अनेकदा या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून सूचना केलेल्या असताना संबंधित अधिकारी व ठेकेदार त्यांच्या सूचनांना वाटण्याच्या अक्षता लावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अधिकारी आणि ठेकेदार मिळून जनतेची दिशाभूल करत नाहीत ना असा संशय ग्रामस्थांतून व्यक्त करण्यात येत आहे. जर अधिकारी आणि ठेकेदार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे म्हणणे विचारात घेत नसतील तर शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मोरीच्या कामाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी उठाव करण्याचा निर्धार केला आहे.


0 Comments