photo source - social media
अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर; FYJC प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार का?
FYJC Admission Will Maratha Reservation Apply: महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती या पाच विभागांच्या अंतर्गत ज्युनियर कॉलेज (FYJC) प्रवेशांसाठी सेंट्रलाइज्ड प्रवेश प्रक्रिया (CAP) ऑनलाइन ठेवण्यात आली होती. आज (२७ जून) अकरावीच्या प्रवेशांसाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. अधिकृत वेबसाइटवर नमूद केलेल्या तपशीलानुसार, ‘विद्यार्थ्यांना लॉग इन करून तात्पुरती (प्रोव्हिजनल) गुणवत्ता यादी पाहता येणार आहे. आज प्रवेश प्रक्रियेची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. या यादीत खालील स्टेप्स फॉलो करून आपण आपला गुणवत्ता क्रमांक पाहू शकता. जर काही तफावत आढळली तर विद्यार्थी तक्रार मॉड्यूल वापरून त्यांची तक्रार करू शकतात.
महाराष्ट्र FYJC: गुणवत्ता यादी कशी तपासायची?
11thadmission.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुख्य पेजवर, ‘महाराष्ट्र एफवायजेसी प्रवेश 2024 पहिली गुणवत्ता यादी’ या लिंकवर क्लिक करा.
एक लॉग इन पेज स्क्रीनवर दिसेल
लॉग इन तपशील टाका – नोंदणी क्रमांक किंवा युजर नेम आणि पासवर्ड.
‘सबमिट’ वर क्लिक करा.
पहिली गुणवत्ता यादी स्क्रीनवर दिसेल
गुणवत्ता यादी काळजीपूर्वक तपासा.
संदर्भासाठी आपल्याकडे प्रिंट काढून ठेवा.
प्राधान्य क्रमातील पहिल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत असल्यास..
गुणवत्ता यादीनुसार, पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या महाविद्यालयांमध्ये २७ जून ते १ जुलै दरम्यान प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. उमेदवारांनी आपले नाव ज्या कॉलेजसाठी पात्र आहे तिथे नावनोंदणी करावी लागेल, जर प्रवेश घ्यायचा नसेल तर हे विद्यार्थी पुढील फेरीसाठी वाट पाहू शकतात, पण एखादा विद्यार्थी त्याच्या प्राधान्याचा यादीतील पहिल्याच कॉलेजमध्ये पात्र ठरला असेल तर मात्र त्याला/तिला तिथे ऍडमिशन घेणे अनिवार्य असेल अन्यथा विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील व त्यांना तिन्ही याद्या जाहीर झाल्यावर प्रवेश घेता येईल.
अकरावीच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार का?
दरम्यान, शिक्षण संचालक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) संपत सुर्यवंशी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी ११ वीच्या प्रथम वर्षाच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या (FYJC) प्रवेशाचे महत्त्वपूर्ण तपशील शेअर केले होते. यानुसार नव्याने लागू करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाअंतर्गत असलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर सूर्यवंशी म्हणाले की, अकरावी प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा नियम लागू होणार आहे. नियमानुसार, या प्रवर्गांतर्गत आरक्षित जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमी-लेअर (NCL) प्रमाणपत्र सादर करावे लागेल. इंडियन एक्सस्प्रेसच्या वेबसाईटवर कॅम्पस टॉक या सदरात ११ जून २०२४ ला यासंदर्भात वृत्त देण्यात आले होते.
source - www.loksatta.com
0 Comments