असं मनाला चटका लावून जाऊ नये...
तळीवाडीचं देखणं आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपलं...न भरून येणाऱ्या पोकळीसारखं...अनंत वारीक याचं नसणं हे मनाला चटका लावण्यासारखंच...नाव घेताच डोळ्यात पाणी आणणारं...
अनंत वारीक नव्हे, संपूर्ण तळीवाडीचा तो बबन वारीक. क्वचित कुणीतरी अनंत म्हणून हाक मारत, नाही तर बबन हाच शब्द त्याला, त्याच्या रुबाबाला आणि एकूणच व्यक्तिमत्त्वाला चपखल...
तसं हे असं भरल्या तळीवाडीतून अचानक निघून जाण्याचं वयच नव्हतं. बबन वारीक...दिसायला रुबाबदार, तरुणांच्या भाषेत सांगायचा तर हॅण्डसम...गोरा...पाच साडेपाच फूट उंच...सुंदर डोळे आणि मध्यम बांधा...ही बबनची पहिली ओळख.
बबनचा स्वभाव हा मनमिळाऊ. सर्वांना संगाती घेऊन चालणं हेही एक वैशिष्ट्य. छोटा-मोठा कोणताही वाद होऊ असू द्या, 'अरे, विसरा आता आणि चला पुढे. वाद घालून काय मिळणार आहे', असे म्हणत पुढे नेणं हाही गुण त्यांच्या रक्तात भिनलेला होता.सामंजस्यपणाही त्याच्याकडून शिकावा...
बबन वारीक आणि ढोलकीपटू ही त्याची खास ओळख. कोणतंही प्रशिक्षण न घेता ढोलकी वाजवण्याचं अंगभूत कौशल्य त्याच्यात होतं. ढोलकी आणि बबन वारीक हे तळीवाडीचं समीकरणं होतं. गणपती उत्सवात आरती असो की बाल्या डान्स असो...बबनची ढोलकीवर थाप पडलीच पाहिजे. इतकंच नव्हे तर अरे बबन चल, वाजवायला सुरुवात कर...पोरं उभी राहतील...असा कुणी तरी आवाज द्यायचा की झालं,
मग तोंडात पान आणि ढोलकीवर थाप पडली की पोरांचे पाय आपोआपच नाचू लागायचे...गाण्याचे बोल असो की आरत्यांची लय...बबनची ढोलकीवरील हुकमत कधी संपली नाही. उलट वाजपात रंगत कशी आणायची आणि नाचणाऱ्याला अजून कसं नाचायला लावायचं याचं कसब बबनजवळ ठासून भरलेलं होतं. तळीवाडीत गणेशोत्सवात प्रत्येक घरात पाच गाणी म्हटली जातात. रात्री ९ ते १० वाजता सुरू झालेला नाच रात्री चार किंवा साडेचार वाजेपर्यंत चालतो. या वेळी सर्वांच्या घरात ढोलकी वाजवण्याचं काम बबन करायचा...माझी बोटं दुखली, कुणी तरी दुसऱ्याने वाजवा असं तो कधीच म्हणत नसे. उलट हौसेने वाजवत असे. तळीवाडीचा नाच कुठेही बाहेर नाचायला जावो, बबन संगाती हवा...आणि बबनही कधी नाही म्हणायचा नाही. या वर्षीपासून प्रत्येक गणपतीला बबन तुझी आठवण संपूर्ण तळीवाडीला येत राहील...ही आठवणच तळीवाडीसाठी 'स्मरणठेव' असेल.
गावातील कोणतंही सामाजिक काम असो की क्रिकेटचे सामने असो...बबनने कधी नाही म्हटलं नाही. तो सर्वांसोबतच असायचा. उमेदीच्या काळात क्रिकेटही खेळायचा. गावातील मुलांना प्रोत्साहन देण्यात त्याचा हातखंडा. सालस आणि लोभस, प्रेमळ बोलणं असल्याने कुणी नाहीही म्हणायचे नाही. इतरांची चौकशी करण्यातही तो कधी कमी पडायचा नाही. गावातील सामाजिक सुधारणांच्या अनेक मुद्द्यांवर गावच्या सभांमध्ये त्यांनी भूमिका घेतली.
माझ्या वैयक्तिक आयुष्यातील एक प्रसंग तसा बोलका होता. त्यावेळी मी आठवी-नववीत असेन. माझे चुलते दत्ताराम घाणेकर आणि गावातील इतरांचा वाद झाला होता. त्यावेळी दत्ताराम यांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी कुणीही पुढे आलं नाही. भांडणाचा आवाज आला म्हणून आम्ही सर्व (आजी, दोन बहिणी) जेवणावरून उठून धावलो. वेळ रात्रीची होती. हाताचं खरखटंही तसंच होतं. मात्र त्यांच्या या मारामारीत फक्त बबन वारीक माझ्या काकांना मारू नका म्हणून मधे पडला होता. मारणाऱ्यांना त्याने आडवले होते. कदाचित त्या दिवशी बबन मधे पडला नसता तर काकांचं काही खरं नव्हतं. इतकंच नव्हे तर काकांना हात धरून तो घरीही घेऊन आला.
असा हा अनंत अर्थात बबन वारीक याने तळीवाडी परिवारातून निघून जाणं म्हणजे काळजाला चटका लावणारं आहे. मनमिळाऊ, लोभस, गोंडस, प्रेमळ, हरहुन्नरी व्यक्तिमत्व क्वचितच असतं...हे सर्व गुण बबनमध्ये होते आणि तळीवाडी परिवाराने असं व्यक्तिमत्व गमावलंय याची सळ मनाला कायमची लागून राहील...कधी तरी शब्द कानी पडतील, अरे, चला नाचायला...मी येतो ढोलकी वाजवायला...
साभार - प्रसाद प्रतिभा सूर्यकांत घाणेकर, पत्रकार
0 Comments