निवारा उभारला, सहारा मिळाला
लोकसहभागातून उभारली प्रवासी निवारा शेड
शिवराज्याभिषेक दिनी स्तुत्य उपक्रम
- संदीप शेमणकर
रत्नागिरी - गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे अनेक बस थांब्यांवर प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. धामणी येथे अद्याप प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्यात आलेली नाही. प्रत्येक थांब्यावर ऊन व पावसात गाडी येइपर्यंत शाळा, काॅलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि वयोवृद्ध तसेच इतर प्रवाशांना उभे राहण्यासाठी निवारा शेड नसल्यामुळे रोज त्रास सहन करावा लागतो.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
निवारा शेड नसल्याने हा त्रास ओळखून धामणी येथील काही मंडळींनी एकत्र आली. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो किंवा आपले ते कर्तव्य समजून अशा लहान लहान गोष्टी आपण करण्याचा जरूर प्रयत्न करूया, अशा विचाराने पावसाळा सुरू होण्यापूर्वी एक तात्पुरती शेड उभारण्याचा एका स्तुत्य उपक्रमाचा निर्णय हाती घेतला.
धामणी बस थांब्यावर दोन्ही बाजूंना बस थांब्याचे फलक नव्हते. यासाठी दोन्ही बाजूंना डिजिटल 'बस थाबा' फलक लावण्यात आले. तसेच जास्त वर्दळ किंवा रहदारी संगमेश्वरच्या भागाकडे असल्याने त्या रस्त्याच्या बाजूला बांबू, प्लॅस्टिक वापरून छप्पर तयार करण्यात आले. पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून त्याही बाजू बंद केल्या. त्यानंतर आत बसण्यासाठी तात्पुरते कडप्पा लावून बाक तयार केले. साधारणपणे वीस बाय पंधराची शेड तयार झाली. दर्शनी भागाला डिजिटल प्रवासी निवारा शेड असा फलक लावण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून प्रवाशांना निवारा शेडची सुविधा उपलब्ध करून दिली.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या समाजसेवेसाठी रामदेव सेल्स धामणी, प्रकाश घाणेकर, अजित कोळवणकर, सिद्धेश खातू,,अमोल गुरव, स्वप्नील सुर्वे, प्रथमेश घाणेकर, प्रणव कोळवणकर, निनाद प्रसादे, ओमकार देवरूखकर, प्रतीक घाणेकर इत्यादी मंडळींनी योगदान देऊन समाजात एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या आदर्श समाजकामासाठी व प्रवाशांसाठी झालेल्या सोयीबद्दल प्रवाशांनी कौतुक केले आणि धन्यवाद दिले.
0 Comments