Header Ads Widget

खासगी-सरकारी बँकांचा एकत्रित नफा विक्रमी ३ लाख कोटींवर


खासगी-सरकारी बँकांचा एकत्रित नफा ३ लाख कोटींवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

मुंबई : देशातील बँकिंग क्षेत्राचा एकत्रित निव्वळ नफा सरलेल्या २०२३- २४ आर्थिक वर्षात पहिल्यांदाच ३ लाख कोटी रुपयांच्या टप्प्यापुढे गेला आहे. उल्लेखनीय म्हणजे यात खासगी क्षेत्रातील बँकांचा एकत्रित निव्वळ नफा १.७८ लाख कोटी रुपये असा सरस असून, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा १.४१ लाख कोटी रुपये आहे. बँकिंग क्षेत्राच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कौतुक केले.

गेल्या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा खासगी बँकांचा निव्वळ नफा जास्त आहे. देशातील २६ खासगी बँकांनी १.७८ लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. याचवेळी १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकत्रितरूपात १.४१ लाख कोटी रुपयांचा नफा मिळविला. परिणामी बँकांचा एकत्रित निव्वळ नफा हा ३.१९ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. तज्ज्ञांच्या मते, बँकांच्या नफ्यात वाढ होण्यास प्रामुख्याने कर्ज वितरणात झालेली वाढ कारणीभूत ठरली आहे. याचवेळी बँकांच्या निव्वळ व्याज उत्पन्नातही भर पडली आहे. तसेच, बँकांनी बुडीत कर्जांचे प्रमाण कमी केल्याचाही परिणाम नफावाढीत दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांच्या या कामगिरीची नोंद समाज माध्यमातून कौतुकपर टिप्पणी करून सोमवारी घेतली. त्यांनी एक्स समाज माध्यमावरील टिप्पणीत म्हटले आहे की, आम्ही सत्तेत आलो त्यावेळी बँका तोट्यात होत्या आणि त्यांच्या बुडीत कर्जांचे प्रमाण जास्त होते. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळातील ‘फोन-बँकिंग’ धोरणामुळे हे घडले होते. गरिबांसाठी बँकांचे दरवाजे बंद होते. आता बँकांच्या स्थितीत सुधारणा झाली असून, गरीब, शेतकरी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्जे मिळू लागली आहेत.

आयटी क्षेत्राच्या नफाक्षमतेलाही मात

बँकांचा सरलेल्या आर्थिक वर्षातील एकत्रित नफा हा अलीकडच्या काळात परंपरेने सर्वात नफाक्षम क्षेत्र असलेल्या माहिती-तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर सेवा (आयटी) क्षेत्रालाही मात देणारा आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये, देशातील भांडवली बाजारात सूचीबद्ध आयटी सेवा कंपन्यांनी १.१ लाख कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला, जो बँकांच्या तुलनेत खूपच कमी आहे. इतकेच नव्हे तर नफ्याचा हा तीन लाख कोटी रुपयांचा आकडा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन तिमाहीत सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या एकत्रित तिमाही नफ्याशी बरोबरी साधणारा आहे.

SOURCE - WWW.LOKSATTA.COM


Post a Comment

0 Comments